महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ फेब्रुवारी) : जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप , विजय जगताप आणि कुटुंबियांचे मंगळवारी (दि. ०७) सांत्वन केले व आशिर्वाद दिले. स्वामींनी घरातील सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.
श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिक विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात व श्री.ष.ब्र. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामी श्री बृहन्मठ होटगी यांच्या नेतृत्वाखाली भक्तीमय वातावरणात व असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत अनेक अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात श्री क्षेत्र होटगी सोलापूर येथे मोठया प्रमाणावर रथोत्सव यात्रा महोत्सव आयोजितही केला जातो.
सोमवारी अश्विनी जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोटनिवडणूकीकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी दिलेल्या भेटीला आणि अश्विनी जगताप यांना दिलेल्या आशीर्वादामुळे त्यांच्या या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.