Google Ad
Uncategorized

पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा पातळी व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, जोखीमग्रस्त गावे ओळखून तिथे शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी. पूर्वतयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र तपासून पाहावेत आणि पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.

जिल्ह्यातील समनव्यक अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी. साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अहवाल तयार ठेवावा. आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात.

Google Ad

डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणीसाठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रकृती पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच इतर सूचनांसाठी एक पुस्तिका तयार करण्यात यावी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे साथ रोगाबाबतची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू,मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आश्रम शाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी देण्यात येत आहेत. पाणी गुणवत्ता नियंत्रण ७६ हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.

परिसर स्वच्छता, डासांपासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सिद्धता, पुरेसा औषध साठा,शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना आणि गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!