महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ फेब्रुवारी) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान आज सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. तर अंगणवाडी सेविकांनाही दिलासा देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला.
अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी अनेकवेळा अंगणवाडी सेविकांनी आंदोलनही केले. तर मागील तीन दिवसांपासून राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत.
या पार्श्वभूमीवरच सरकारने अंगणवाडी सेविकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अजूनही त्यांच्या काही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन देखील सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच मानधन आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणीही अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे.