महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २० मार्च २०२३ : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवरती जनता नाराज असून सरकारच्या या धोरणांमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याअनुषंगाने उद्या मंगळवारी (दि. २१ मार्च २०२३) मुंबईत विधानसभा घेराव आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली आहे.
याबाबत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोणतीही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता ही सरकारच्या धोरणाचे अपत्य असते. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारचे धोरण पाहता अच्छे दिन नको जुने दिन परत आणा अशी बहुसंख्य भारतीयांची भावना झाली आहे. नोटबंदीचे अघोरी कृत्य, सेवा आणि वस्तू कर यांची चुकीची अंमलबजावणी आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम झाला आहे. तरुणाई ही भारताच्या जागतिक राजकारणातील सर्वात महत्वाची ताकद असून मोदी सरकारच्या काळात तरुणाला रोजगाराची संधी देण्यापेक्षा कधी पकोडा तळण्याचे तर कधी संन्याशी होण्यास सांगितले जात आहे. तरुणांच्या हातात संविधानाऐवजी द्वेषाचे पुस्तक देण्यात येत असून रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी सारख्या हजारो तरुणांचा दररोज संस्थात्मक खून करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ, शासकीय नोकरी, छोटे उद्योगधंदे येथे ‘स्किल इंडियाला’ प्रोत्साहन देण्याऐवजी ‘किल इंडिया’ चे धोरण अवलंबवले जात आहे.
केंद्रीय स्तरावरून सुरुवात झालेले हे राजकारण राज्यांपर्यंत देखील येऊन पोहोचले आहे . मोदी सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा वापर करून देशात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे. याचे शिकार छोट्या राज्यांसह मोठी राज्ये देखील होत असून महाराष्ट्र देखील त्याचे शिकार झाले आहे. महाराष्ट्रातील शिव-शाहू-फुले-गांधी-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा, महाराष्ट्रातील सुजलाम, सुफलाम भूमीतील उद्योगधंदे, महाराष्ट्राचा आत्मा मुंबई यावर नियोजनबद्ध रीतीने घाला घालायचे काम चालू आहे. याविरोधात योग्यवेळी आवाज उठवला नाही तर महाराष्ट्रातील पुरोगामी विचार, इथली सुपीक जमीन, उद्योगधंदे, तरुणांचे भविष्य सर्वच नष्ट होऊन जाईल.
बँकांचे सार्वत्रिकीकरण असो, अथवा जागतिककिरणाच्या युगात देखील माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अथवा अन्न सुरक्षेचा अधिकार असो किंवा मनरेगा असो काँग्रेसच कल्याणकारी राज्यांची संकल्पना प्रभावीपणे राबवू शकते हे सिद्ध झाले आहे. आजही हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये जुनी पेन्शन योजना राबवून काँग्रेसने हे सिद्ध केले आहे. महाराष्ट्राने देशाला कायम दिशा दिली आहे. हि दिशा देण्यासाठीच, शेतकरी, तरुण आणि मध्यमवर्गीयांचा आवाज म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे विधानसभा सारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरातून गद्दारांचा कडेलोट करण्यासाठी विधानसभा घेराव करण्याचे ठरविले आहे.