Google Ad
Editor Choice

मोदींच्या बळाचे गमक काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ऑक्टोबर) : नरेंद्र दामोदरदास मोदी हे नाव गेली अनेक वर्षे भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ७ ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सतत काहीना काही कारणांमुळे हा माणूस चर्चेत राहिला. अनेकदा ही चर्चा नकारात्मक होती, एकांगी होती. परंतु मोदींची प्रतिमा काळवंडण्याचे सामर्थ्य ना या चर्चेत होते, ना चर्चेच्या सूत्रधारांमध्ये.

ऑक्टोबर २००१ मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेणाऱ्या मोदींच्या कारकीर्दीला आज ७ ऑक्टोबरला २० वर्षे पूर्ण झाली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी १३ वर्षे आणि देशाच्या पंतप्रधानपदी सात वर्षे अशी ही जनसेवेची २० वर्षे आहेत.
मोदी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात गुजरातच्या गोध्रा स्थानकावर साबरमती एक्सप्रेसमधून आलेल्या ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. त्यामुळे गुजरात पेटला. जातीय दंगलीच्या आगीत होरपळला.

Google Ad

गोध्राकांड घडले म्हणून गुजरात दंगल घडली. परंतु जणू गोध्राकांड घडलेच नाही अशा थाटात मीडिया आणि पुरोगामी गॅंगने गुजरात दंगलींचा ठपका मोदींवर ठेवायला सुरूवात केली. त्यांना यथेच्छ झोडण्यात आले. परंतु गेल्या काही वर्षात आरोपांची राळ उडवणारे संपले, निष्प्रभ झाले. मोदींची उंची मात्र कमी झाली नाही. उलट दिवसागणिक वाढत गेली.

मुख्यमंत्री पदावर आल्यापासून मोदीच्या विरोधात सुरू झालेली प्रचार मोहीम अजून थांबलेली नाही. देशात मीडियाचे नियंत्रण असलेले डावे, पुरोगामी आणि सत्तेची सूत्रं हाती असलेला काँग्रेस पक्ष मोदींना संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत असताना मोदी सतत आपल्या कक्षा विस्तारत राहीले. अनेकांना हे कोडे वाटते. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला काँग्रेससारखा पक्ष सत्तेत असताना, देशातील प्रमुख मीडिया विरोधात असताना मोदींनी मिळवलेल्या यशाचे अनेकांना अप्रूप वाटते.


मोदींच्या यशाचे आकलन करण्यासाठी फार सखोल संशोधनाची गरज नाही. ते सतत सावध राहिले, ते सतत काम करत राहिले हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. मोदींचे विरोधक केवळ आरोप करण्यात व्यस्त होते. केवळ आगपाखड करण्यापलिकडे काहीच करत नव्हते, तेव्हा मोदी १८-१८ तास काम करत होते. गेली २० वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावर काम करताना त्यांनी एकही सुटी घेतलेली नाही. इतकी वर्षे सलग न थकता काम करणे ही गम्मत नाही. त्यासाठी प्रचंड शारीरीक आणि मानसिक क्षमतेची गरज असते. मोदींकडे ही क्षमता इतकी मोठी आहे की, त्यांचे स्पर्धक त्यांच्या आजूबाजूला उभेही राहू शकत नाहीत. राजकारण ही दमाची लढाई आहे, मोदी त्यात सरस ठरले.

सत्तेचा गाडा गोरगरीबांनी दिलेल्या मतांवर अवलबूंन असतो हे मोदींना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुखकर व्हावे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. घर तिथे शौचालय असावे यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर देशभरात शौचालये बांधण्याची मोहीम हाती घेतली. ग्रामीण भागात शौचालयांच्या अभावामुळे महिलांची होणारी कुचंबणा थांबवली. जनधन खाती उघडली जावी म्हणून त्यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली. देशभरात ४० कोटी जनधन खाती उघडली गेली. सरकारी योजनांचे लाभ थेट लोकांच्या खात्यात जमा होऊ लागले. भ्रष्टाचाराला लगाम बसला. उज्ज्वला योजनेद्वारे त्यांनी महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती दिली. गावोगावी वीज पोहोचवली. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला घरे देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
मोदींनी जे काही केले त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो आहे. देशात आज कोट्यवधी लोकांसमोर पोटाचा प्रश्न सर्वात मोठा आहे. त्यांना राजकारणाशी देणेघेणे नाही. रोजीरोटीची गरज भागवण्यासाठी त्यांच्या संघर्ष सुरू असतो.

गंभीर आजार झाला तर हॉस्पिटलचे बिल चुकवण्याइतपतही त्यांची ताकद नसते. मोदींनी अशा लोकांसाठी आयुष्यमान भारतसारख्या योजना आणल्या. आज हे लोक मोदींच्या पाठीशी उभे आहेत. विरोधकांनी गेल्या सात वर्षात अनेक मुद्दे उचलले, कोलाहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारबाबत जनमत कलुषित होईल यासाठी सर्व ताकद लावली. परंतु सर्व तीर वाया गेले. ना मोदींची प्रतिमा डागाळली ना भाजपाची ताकद क्षीण झाली. जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. २०१९ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळवून मोदी सत्तेवर आले. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काडीचीही किंमत न देता जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.

मोदींना बदलत्या काळाचे भान आहे. देशात सोशल मीडियाचे आगमन झाल्यानंतरचे राजकारण बदलले आहे. इथे कोणतीही गोष्ट लपून राहात नाही. लोक दुर्बिण घेऊन तुमच्यावर नजर ठेवत असतात. तुमच्या चुका आणि तुमची कामे अनेक पटींनी मोठी दिसतात. सुदैवाने मोदींकडे लपवण्यासारखे काही नाही हे त्यांचे सर्वात मोठे शक्तीस्थळ आहे.

हम फकीर है, एक दिन खाली झोला लेकर चले जायेंगे. असे म्हणण्याचे धाडस दाखवू शकेल, असा देशातील हा एकमेव नेता आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मोदींचा एकही विरोधक असे म्हणण्याचे धाडस करू शकत नाही. यातल्या अनेकांचे हवाला व्यवहार आहेत, शेल कंपन्या आहेत, नातेवाईकांच्या, मित्रांच्या नावे बेनामी प्रॉपर्टी आहे, नामवंत व्यावसायिक तज्ज्ञांचा फौजफाटा बाळगूनही लपवता येणार नाही इतका पैसा यांनी कमावलाय. मोदी इथेच सर्वांना भारी पडतायत. त्यांच्या प्रामाणिकपणाला, सचोटीला काटशह देणारे अस्त्र विरोधकांकडे नाही. त्यांच्यावर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप टिकत नाही.


एकेकाळी काँग्रेस गरिबी हटावची घोषणा देऊन सत्तेत आली होती. परंतु सोशल मीडियामुळे आज लोक खूप जागरुक झाले आहेत. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असे आजचे राजकारण आहे. इथे घोषणाबाजीवर काम चालत नाही, काम केल्याशिवाय कोणी टिकू शकत नाही. मजबुतीने पाय रोवू शकत नाही. मोदी तेच करतायत. परंतु काँग्रेसला अजून जुन्या टोटक्यांवर विश्वास आहे. मीडिया, एनजीओंचे जाळे वापरून आपण सत्तेवर येऊ शकतो याच भ्रमात काँग्रेस आहे. त्यामुळे वरचे वर बँकाँक दौरे करायचे, मौज मजा करायची आणि फावल्या वेळेत आंदोलन करून सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहायची असा प्रकार काँग्रेसचे नेतृत्व करते आहे.
अशा विरोधकांमुळे मोदींना बळ मिळते आहे. काम केल्याशिवाय सत्तेवर येऊ, या भ्रमात काँग्रेस आहे, तोपर्यंत या देशात मोदींना पर्याय नाही. मोदी कामांमुळे आणि अथक कर्तृत्वामुळे घडले आहेत. मीडियाच्या बळावर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे प्रयत्न करणारे मूर्खांच्या नंदनवनात वावरतायत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!