केईएम मधील व्हायरल व्हिडीओ ची सत्यता आणि डॉक्टर काय आहे? … संगतायेत, ‘वायसीएम हॉस्पिटलचे’ डॉ.प्रकाश कोयाडे

 

महाराष्ट्र 14 न्यूज : केईम हॉस्पिटलमधील एक विडीओ सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये, ‘जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले’ असे म्हणून नातेवाईक डॉक्टरांना शिवीगाळ करत आहेत, तिथल्या स्त्री डॉक्टरच्या अंगावर धावून जात आहेत. तो विडीओ इथे टाकणं म्हणजे अजून व्हायरल करण्यास हातभार लावणं म्हणून विडीओ किंवा लिंक देत नाही.
त्या प्रसंगातील दोन फोटो इथे देत आहे.

प्रसंग कसा घडत गेला ते पाहू : 
त्या व्हेंटिलेटरवर असलेल्या कोविड रुग्णाच्या शरीराने कोणत्याही उपचारास प्रतिसाद देणं बंद केलं, नाडी बंद पडली, मॉनिटरवर हृदयाचे ठोके दर्शविणारी रेषा सरळ आली. डॉक्टरांनी इसीजी केला ज्यामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला हे निदान स्पष्ट झाले.
रुग्णाच्या नातेवाईकांना मृत्यू झाल्याचे कळवले आणि ते सरळ आयसीयु मध्ये विनामास्क, विना पीपीई किट घुसले. रुग्णाचा मृत्यू झाला यावर ते विश्वास ठेवायला तयारच नव्हते. त्यातील एकाने उघड्या हाताने मृत व्यक्तीच्या शरीराला हात लावून पाहिले तेव्हा त्याला ते शरीर गरम वाटले. डॉक्टर समजावून सांगत होते पण नातेवाईक ऐकून घेण्याच्या परिस्थिती नव्हते. रुग्णाचे शरीर गरम आहे, रुग्ण जिवंत आहे असे म्हणून आरडाओरडा करु लागले. (मृत्यू झाल्यास लगेच शरीर थंड होत नाही त्यासाठी बराच वेळ लागतो, किमान एक तास).

नातेवाईकांनी डॉक्टरांना मशिन (मॉनिटर) सुरू करायला सांगितले. डॉक्टरांनी काहीही उत्तर न देता मॉनिटर सुरू केले. मॉनिटरवर काही रेषा चढउताराने दिसू लागल्या आणि ते पाहून नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यातील काहींनी मृत व्यक्तीच्या छातीवर हात ठेवून ‘धक धक’ सुरू आहे असे सांगितले आणि शिवीगाळ सुरू झाला.
हा डॉक्टरांना केलाला शिवीगाळ, आरडाओरडा अत्यंत खालच्या पातळीवर केला गेला. घरच्यांचं नाव घेऊन अर्वाच्य शिव्या दिल्या. त्या डॉक्टर अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेल्या आहेत. तुमचा नातेवाईक गेला, दु:ख झाले हे समजू शकतो पण कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने रियॅक्ट झाले आहेत ते केवळ चुकीचेच नाही तर तो गुन्हा आहे.

मॉनिटरवर ज्या रेषा दिसत आहेत त्या रुग्णाच्या नसून व्हेंटिलेटरच्या रेषा आहेत. व्हेंटिलेटर सुरू आहे, त्यातून अॉक्सिजन बाहेर पडतोय, त्याची लय दाखवणाऱ्या त्या रेषा आहेत. ते पाहून पेशंट जिवंत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. एकजण म्हणतोय की धडधड सुरु आहे… कधीकधी डॉक्टरने कानाला स्टेथोस्कोप लावून सुद्धा आवाज ऐकू येत नाही. रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर मॉनिटरवर पाहिल्याशिवाय पर्याय राहात नाही आणि हे हात लावून म्हणत आहेत की पेशंट जिवंत आहे.

सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी काम करावे की नाही हा प्रश्न आज आहे?
कोणीही उठावं शिवीगाळ करावा, कोणीही यावं मारहाण करावी, अंगावर यावं… अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे!
काही लक्षणं दिसू लागली की मेडिकल वरून गोळ्या घ्यायच्या, आठवडाभर दुखणं अंगावर काढायचं, लक्षणे वाढली की टेस्ट करायची. तोपर्यंत रुग्ण बॅड होऊ लागतो, मग आयसीयुसाठी धावपळ… त्यातून रुग्ण बरा झालाच तर खाजगी हॉस्पिटल असेल तर लाखांवर बिल काढले म्हणून उद्धार होतो, सरकारी दवाखाना असेल तर डॉक्टरांना पेशंटमागे लाख रुपये मिळतात म्हणून अफवा पसरवल्या जातात आणि रुग्णाचा मृत्यू झालाच तर मारहाण आणि शिवीगाळ ठरलेला आहेच.
‘कोविड योद्धे’ वगैरे ढोंग आहे… ही ट्रीटमेंट एखाद्या योद्ध्याला कोण देते?
विडीओ पाहून अंदाज येईल की, त्या डॉक्टरांचेच नाही तर सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचेच किती मानसिक खच्चीकरण झाले असेल, पुन्हा काम करायची इच्छा राहिल का?

उपचार घेण्यास लायक नाहीत हे लोक!
कोरोना नाही म्हणणारे लोक, त्यांना साथ देणारे राजकीय नेते आणि हे मारहाण करणारे, शिवीगाळ करणारे लोक यांची मानसिकता एकच!
कितीतरी डॉक्टर, सिस्टर या महामारीत काम करता करता रोज मरत आहेत. स्वत: हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याच नातेवाईकांना बेड मिळत नाही अशी परिस्थिती या कर्मचाऱ्यांची आहे. घरातली कितीही जवळची व्यक्ती कोरोनाने गेलीच तर दोन दिवसांत पुन्हा कामावर रुजू व्हावे लागते.

…या लायकी नसलेल्या लोकांसाठी!!
हा काही एकमेव प्रसंग नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडतोय. ही महामारी जगभरात आहे पण असे प्रसंग इतर कोणत्याही देशात घडताना दिसून येत नाहीत, भारतात मात्र सर्रास असे डॉक्टरांवर शाब्दिक आणि शारीरिक हल्ले होत आहेत. सुरक्षिततेसाठी कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. घटना घडून गेल्यानंतर व्यवस्था जागी होते हेही एक विशेष आहे! प्रत्येक वेळी आंदोलन केल्यानंतरच कारवाई करण्यापेक्षा आधीच काही उपाययोजना करणे आवश्यक आहे पण तसे होत नाही.

सरकारी आरोग्य व्यवस्थेने जर आपला ‘स्वार्थ’ बघितला तर शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनर्थ घडेल पण असा विचारही कोणी करत नाही. एकाच्या चुकीमुळे इतरांचे नुकसान नाही करू शकत आणि हेही खरंच की आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही, कर्तव्य म्हणूनच काम करतोय!
त्यामुळे कोविड योद्धा वगैरे तुमच्याकडेच ठेवा. डॉक्टरांचे आभार मानू नका, हात जोडू नका, कसला आदरही देऊ नका.
फक्त एक विनंती,
असली शिवीगाळ करू नका, मारू नका… कुठेतरी आत्मविश्वास डळमळीत होतो!

डॉ प्रकाश कोयाडे’
(YCM Hospital Pune)

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago