महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.७ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सांगवी गावातुन मुळा व पवना या दोन नद्या वाहतात. या नद्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये बेसुमार जलपर्णी वाढली आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. या जलपर्णीमुळे या परिसरात डासांचा (मच्छर) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मच्छर यांचे प्रमाण संध्याकाळनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो की घरात व घराबाहेर नागरिक दोन मिनिटे देखील एका जागेवर थांबू शकत नाहीत, यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून काहीएक उपायोजना होत असताना दिसत नाहीत व यामुळे सांगवीतील नागरिकांना या डासांचा महाभयानक त्रास सहन करावा लागत आहे.
पाऊस पडून नदीतील पाण्याचा प्रवाह वाढून पावसाळ्यापर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे. तोपर्यंत या जलपर्णी काढण्याचे टेंडर न काढता व पाऊस पडल्यावर नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यावर महानगरपालिका या कामाचा ठेका ठेकेदारास देऊन महानगरपालिकेच्या या कामात मलई लाटण्याचे काम करतील असेच म्हणावे लागेल.
पवनानदी शहरातील मध्यभागातून वाहते. तर, इंद्रायणी व मुळा या दोन नद्या शहराच्या सीमेवर आहेत. मावळ व मुळशी तालुक्यासह व इतर भागांतील उद्योग, कारखाने, लघुउद्योग, ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच, शहरातील भागात तयार होणारे रासायनिक व इतर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जाते. ते सांडपाणी थेट नदीत येऊन मिसळते. त्यामुळे नदी अतिप्रदूषित झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होऊन पात्र अधिक अस्वच्छ झाले आहे. त्यामुळे जलचराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याबाबत राज्याच्या पर्यावरण विभागाने महापालिकेस अनेकदा नोटिसा बजावल्या असून, बैठकांमध्ये महापालिका अधिकार्याना खडसावले आहे.
नदीपात्र स्वच्छ करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादासह राज्याच्या पर्यावरण विभागाने महापालिकेस अनेकदा दिले आहेत. महापालिकेकडून नदीप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी जलपर्णी निर्माण होऊन ती स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
हिवाळ्यात जलपर्णीच्या बिया निर्माण होऊन त्यांना कोंब फुटतात. उन्हाळ्यात त्याची वेगात वाढ होऊन पात्र जलपर्णीने व्यापून जाते. पावसाळा संपल्यानंतर लगोलग महापालिकेने जलपर्णीच्या बिया व कोंब नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत. वरील भागांतून नदीपात्रात येणारी जलपर्णी सीमेवरच अडवून ती नष्ट केली पाहिजे. जलपर्णी वाढूच नये म्हणून महापालिकेने नियोजनबद्ध ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
नदीपात्रात जलपर्णी तयार होऊ नये म्हणून महापालिकेने उन्हाळ्यापूर्वीच उपाययोजना करावी. नदीपात्रात जलपर्णीच्या बिया तयार झाल्या झाल्या त्या नष्ट कराव्यात. त्यामुळे वाढ न झाल्याने जलपर्णी फोफावणार नाही. त्याचा त्रास नदीकाठच्या रहिवाशांना होणार नाही. तसेच, जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून होणारा कोट्यवधींचा खर्चात बचत होईल.