महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑक्टोबर २०२३) : भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स २०२३ साठी शहरी वाहतूक विभागांमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर काम करणाऱ्या महानगरपालिका, मेट्रो कार्पोरेशन, बस कार्पोरेशन यांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संपूर्ण भारतातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विना वाहन वापर ( एन एम टी ) धोरणास व त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या कामांचा समावेश असलेल्या पिंपळे सौदागर परिसर, सांगवी- किवळे रस्ता व नाशिक – फाटा वाकड रस्ता यावरील सायकल मार्ग व पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविल्या बाबतची प्रवेशिका २५ ऑगस्ट २०२३ रोजी शहरी विकास मंत्रालयाकडे सादर केली होती.
त्यामध्ये भारतातील अनेक शहरांमधून पिंपरी चिंचवड शहराची निवड होऊन त्या संदर्भातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२3 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मिळालेबाबत घोषित करण्यात आले. सदरचे पारितोषिक शहरी विकास मंत्रालय भारत सरकार चे सचिव माननीय मनोज जोशी यांचे हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिल्ली येथील माणिक शॉ सेंटर येथे आयोजित केलेल्या १६ व्या शहरी वाहतूक विकास परिषदेत स्वीकारले. सदर पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी आयुक्त यांचे समवेत प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता सुनील पवार, आयटीडीपी चे प्रांजल कुलकर्णी तसेच डिझाईन शाळा चे संचालक आशिक जैन उपस्थित होते.