महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन होवून सहा महिने होत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.
महायुतीतील भाजप,अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाकडे तुल्यबळ उमेदवार असल्याने स्वतंत्र निवडणूक लढतील अशी परिस्थिती आहे. तर ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी व मनसे या पक्षाची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यात दोन ठाकरेंचे काय होते यावर ही बरच काही अवलंबून आहे.

▶️इच्छुक गेले साडेतीन वर्ष कुठे लपून बसले होते??
प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने पक्षाच्या कार्याच्या माध्यमातून व स्वतंत्र नागरिकांमध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा कामाच्या माध्यमातून जनते समोर जात आहेत मात्र हे इच्छुक गेले साडेतीन वर्ष कुठे लपून बसले होते ?? असा प्रश्न शहरातील नागरिक विचारू लागले आहेत, आणि हे आता “कसे यायला लागले”, ही दबक्या आवाजातील चर्चा ही सुरू आहे. आषाढ झाला, श्रावण आला यात काय करता येते का पाहू नाहीतर दिवाळी आहेच, वाट तर पहावीच लागेल, अनेक कल्पनांच्या शोधात इच्छुकांची दमछाक होणार आणि जनतेची दिवाळी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेला चार चा प्रभाग होणार हे जवळपास निश्चित झाले असल्याने घरात बसलेले इच्छुक आता नागरिकांच्या दारादारात फिरताना दिसून येत आहेत, पण जनता सूदन्य आणि हुशार आहे, हे यांना कोण सांगणार..?? सोशल मीडियावर इच्छुकांची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे, जनतेसमोर जाण्याचा ते बहाना शोधत आहेत, पण जनता हुशार आहे , कायम स्वरूपात आपल्या मदतीला धावून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांलाही डोक्यावर घ्यायला ती कमी पडत नाही , आणि मागे मोठा नेता असला तरी काम न करणाऱ्याला घरी बसवायलाही कमी पडणार नाही, अशी या अगोदरची अनेक उदाहरणे सर्वानी अनेक निवडणूकित पहिली आहेत, ते शहाण्यांना सांगण्याची गरज नाही …
पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनसंवाद सभा आयोजित करण्यात येते, त्यातही असेच चित्र पहायला मिळते, इच्छुक आपल्या लेटरहेडवर वार्डातील कामांची कुंडलीच घेऊन येतात आणि अधिकाऱ्याला फैलावर घेऊन स्वतःची चमकोगिरी करताना दिसतात , आता एवढंच बाकी राहिले की भाजीवाल्याचा भोंगा घेऊन कोणाचे काही काम आहे का ? काम …. असे ओरडले नाही म्हणजे मिळवलं…!!
पिंपरी चिंचवड शहरात आणि पुण्यातही भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट तर शिंदे गट शिवसेना यांचे कार्यकर्ते म्हणजेच महायुती व महाविकास आघाडीत नेते कितीही म्हटले तरी बिघाडी होण्याचे चित्र असताना भाजपा ही आपली ताकद दाखवण्याकरिता स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, त्यामुळे काटे की टक्कर आगामी निवडणुकीत या दोन्ही शहरात दिसणार यात शंका नाही.
गेली तीन वर्षे रखडलेली निवडणूक आता डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठ वर्षांनी नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगणारे कार्यकर्ते आणि महिला इच्छुक मोठ्या संख्येने इच्छुक आहेत.
▶️उमेदवारीचे निकष काय असणार?
महायुती कायम राहणार की फाटाफूट होणार, हे ठरवणारे प्रमुख निकष म्हणजे जागावाटप असणार आहे. उमेदवारीचे निकष आणि स्थानिक पातळीवर राजकीय समजूतदारपणा महत्वाचे ठरणार आहे. पक्षासाठी निष्ठावान कार्य करणाऱ्यांना संधी द्यावी की मनी-मसल पॉवरवाल्यांना प्राधान्य द्यावे, या चर्चांना उधाण आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनात्मक नियुक्त्या रखडल्या आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही प्रमुख पदांवरील नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, इतक्या दिवस या नियुक्त्त्या रखडल्याने शहरातील भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.या नियुक्त्यांमागे फक्त संघटनात्मक धोरण नसून, त्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीची पायाभरणी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व मिळते, यावर भविष्यात उमेदवारी कुणाला मिळेल, हे ठरणार असल्याने ही रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे.