Categories: Uncategorized

पुणे जिल्ह्यातील भंडारा डोंगरावर साकारतेय नागरशैलीतले महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर  जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवरील मंदिरामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

भंडारा डोंगरावर साकारतेय नागरशैलीतले महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर

जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवरील मंदिरामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ डिसेंबर) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना ज्या भंडारा डोंगरावर अभंग वाणी स्फुरली, त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात येत असून, नागरशैलीत बांधण्यात येत असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पहिलेच बांधकाम आहे. गुजरातमधील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या आधारावर हे मंदिर उभे राहत असून, या मंदिराचे चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे.
मंदिराच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी जवळपास 200 ते 225 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भक्तांच्या आर्थिक सहाय्याच्या रूपाने निधी उभारला जात आहे. मंदिराचे बांधकाम हे 25 हजार स्क्वेअर फुट जागेत होत असून, मंदिराची लांबी 179 फूट व उंची 87 फूट, तर रुंदी 193 फूट आहे. मंदिराला तीन भव्य कळस असतील. मंदिराचा कळस सुमारे 96 फूट ते 87 फूट एवढ्या मोठ्या आकाराचा असेल. या ठिकाणी एकाच वेळी अनेक भक्त दर्शनाचा लाभ घेऊ शकतील; तर मंदिराला छोटे 17 कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट हा 34 फूट बाय 34 फूट या आकाराचा असेल. त्यामुळे मंडपाची शोभा वाढणार आहे. मंदिरात पाच गर्भगृह असणार असूनही, ते 13.5 फूट बाय 13.5 फूट आकाराचे असतील. गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या असतील. मंदिराला एकूण नऊ दरवाजे असतील. मंदिराचे फाउंडेशन जवळपास नऊ फुटाहून अधिक घेण्यात आले आहे.


मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अंदाजे चार फूट उंचीची मूर्ती ही समोरच्या बाजूला बसविण्यात येणार आहे. मंदिरात भक्तांसाठी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. मंदिराच्या मंडपावर व भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीवकाम केलेले असेल. मंदिराच्या छतावर देखील सुंदर असे नक्षीकाम पहावयास मिळणार आहे. मंदिराच्या बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील काम हे अष्टकोणाकृती असतील व त्यावर वैष्णवांच्या तब्बल 2200 मूर्तींचे कोरीव काम केलेले असेल. मंदिराच्या समोर उजवीकडे व डावीकडे शृंगार चौक असतील.

तुकाराम महाराजांनी ज्या वृक्षाखाली बसून गाथा लिहिली. तो नांदूरकी वृक्ष देखील मंदिराच्या बाहेरील भागात मंदिराचाच एक घटक म्हणून असणार आहे. एकूणच 122 खांबांवर हे मंदिर उभे राहणार असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे लोखंड वापरण्यात आलेले नाही. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये हे बांधकाम करण्यात येत आहे. यातील प्रत्येक पिल्लरमध्ये प्रत्येकी 24 मूर्ती असणार आहेत. विशेष म्हणजे स्लॅब हा दगडांमध्ये बनणार असून, 12 ते 15 फूट आकाराच्या भव्य दगडांमध्ये हा स्लॅब असणार आहे.

महत्त्वचे म्हणजे भंडारा डोंगराच्या पायथ्याला भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. स्वागत कमानीत वरच्या बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची विनाधारी मूर्ती असणार आहे. तर स्वागत कमानीच्या समोर गोल रिंगन असून, त्याच्या मध्यभागी मुरली वाजवतानाचा श्रीकृष्ण व चारी बाजूला गायी असणार आहेत. कमानीच्याच बाजूला फूड कोर्टचेही नियोजन करण्यात येणार आहे.
——————————–
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा करीताहेत मंदिराची उभारणी :
मंदिर उभारण्यासाठी वास्तुविशारद म्हणून गांधीनगरच्या अक्षरधाम व अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित चंद्रकांत सोमपुरा व वास्तुविशारद परेशभाई सोमपुरा हे काम पाहत आहेत. चंद्रकांत सोमपुरा यांनी आजपर्यंत गुजरातमधील सोमनाथ मंदिर, अक्षरधाम ग्रँड मेमोरियल, अयोध्येतील श्रीराम मंदिर, हिंदू जैन मंदिर यूएसए, सप्तयतन मंदिर एक धर्मक्षेत्र, लक्ष्मीनारायण मंदिर उधाणा अशा मोठ्या मंदिरांची कामे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत.
——————————————-
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे हे भव्य मंदिर नागरशैलीमध्ये उभारण्यात येत असून, या शैलीतील महाराष्ट्रातील हे पहिलेच भव्य मंदिर आहे. या मंदिरासाठी बन्सी पहाडपूर गुलाबी दगड व मकराना पांढरा सफेद दगड वापरण्यात येत आहे. मंदिराचा अंदाजित खर्च 200 ते 225 कोटी रुपये अपेक्षित आहे. पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये या मंदिराचे काम पूर्णत्वास जाईल. भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत केल्यास हे काम लवकर पूर्णतः जाण्यास मोठी मदत होणार आहे.
– मानशंकर सोमपुरा, टेक्निकल इंजिनियर.
——————————————-
मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ट्रस्टला देणगी मिळत आहे. या देणगीची मंदिराच्या बांधकामासाठी मोठी मदत होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे येऊन मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी, जेणेकरून मंदिराचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
बाळासाहेब काशीद, अध्यक्ष, भंडारा डोंगर ट्रस्ट

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर … अशी असणार प्रभाग रचना

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट :- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याकरीता आणि हरकती…

1 day ago

यमुनानगर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम आयोजित मंगळागौर कार्यक्रमात महिलांनी केली धमाल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट : केशवराव ठाकरे स्टेडियम यमुनानगर येथे सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती…

1 day ago

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब चिंचवडमध्ये पारंपरिक जल्लोषात संपन्न भव्य सोहळा

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21…

2 days ago

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५ … उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 21 ऑगस्ट -- उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्का देण्यासाठी…

2 days ago