महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ सप्टेंबर) : पुणे सर्वार्थाने धार्मिक व पावन जिल्हा असून,आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला पं. प्रदीप मिश्रा यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदेखील याच जिल्ह्यात झाला. ज्यांच्यामुळे देव-देश आणि धर्म वाचला. या जिल्ह्यात लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राजकारण, समाजकारण यासह त्यांनी धार्मिक धागाही जपला. असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक व भाजपाचे शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप, चिंचवडच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, श्री. अण्णाजी महाराज, पं. भागवताचार्य, बाळासाहेब काशीद, पं. भवानी शंकर, संत मनसुख महाराज, रामेश्वर शास्त्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक तथा भाजपचे शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप यांनी प्रास्ताविक केले. परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांचे प्रथमच आपल्या शहरात आगमन झाले आहे, आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करताना भगवान शंकराची कृपा आपल्यावर अशीच रहावी, अशी मनोकामना जगताप यांनी केली. सात दिवसांच्या या कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील जगताप यांच्याकडून करण्यात आले. त्यानंतर जय श्रीराम आणि हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पं. प्रदीपजी मिश्रा यांचे अनेक भक्त गेल्या २ दिवसांपासूनच सभामंडपात ठाण मांडून बसले होते. आजच्या कथेच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक भाविक शिव पुराण ऐकण्यासाठी सभामंडपात आले होते. व्यवस्थापन करताना सुरक्षा रक्षक तसेच पोलिसांनी सतर्कता ठेवली. लक्ष्मणभाऊ जगताप प्रवेशद्वारातून सातत्याने गर्दीचा ओघ सभामंडपाकडे जात होता. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील देखील जनसमुदाय आहे की, मुंबईतील समुद्र… अशा शब्दांत व्यक्त झाले.