महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑक्टोबर) : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतरही जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार असल्याचं चित्र आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताच त्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जरांगे पाटील हे प्रामाणिक आहे. पण त्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
आरक्षणाचा मुद्दा 40 वर्षांपासूनचा आहे. आरक्षणावर बोलणाऱ्या विरोधकांनी काय केलं? रस्त्यावर का आला हा समाज? यांनीच त्रास दिला. वंचित ठेवलं. आरक्षणावर ओरडणाऱ्यांनी प्रत्यक्षात काय केलं? या आरक्षणाचं फायनल काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करतील, असं सांगतानाच जरांगे पाटील यांच्यामागे अदृश्य शक्ती आहे. ते प्रामाणिक आहेत. पण आजूबाजूचे लोक फायदा घेऊ इच्छितात. फायदा घेणारे हे सगळे भोंगे आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
टिकणारं आऱक्षण देणार
मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका ठरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. जाहीर सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला सगळ्यात चांगलं उत्तर दिलं आहे. यात काही कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाला आरक्षण देणं ही गरज आहे. 50 टक्केची लिमिट वाढेल की आणखी काय करता येईल हे पाहावं लागणार आहे. टिकणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणत आहेत. त्यामुळे इतरांनी ते समजून घेतलं पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.
घोटाळेबाज कोण हे कळेल
कालच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे साहेब आधी सत्ता आणा. मग उलटं टांगा. तुम्हाला ही भाषा शोभत नाही. आम्हाला उचला, अरबी समुद्रात टाका. पण तुमची सत्ता यायला 25 वर्ष लागतील, असा हल्लाच त्यांनी चढवला. उद्धव ठाकरे हे घोटाळा नाही तर कलाकार आहेत. जे तुम्हाला जमलं नाही ते एका सर्वसाधारण शिवसैनिकांने करून दाखवलं. त्यामुळे तुमच्या पोटात दुखू लागलं आहे. घोटाळेबाज कोण हे कळेल. संजय राऊत बेलवर आलेत. वायकर यांना नोटीस आली आहे. घोटाळे पुढे येतील. चेहरे उघड पडतील, असा दावाही त्यांनी केला.
भाजपमध्ये मतभेद नाही
यावेळी त्यांनी भाजप नेते निलेश राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील वादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद आहे की नाही याची कल्पना नाही. दोघांनाही फडणवीस यांनी बोलावलंय. त्यांची समजूत काढली जाईल. भाजपमध्ये अंतर्गत बंड नाही. काही मतभेद नाही, तोडगा काढला जाईल, असं ते म्हणाले.