महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ जानेवारी : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा नुकताच निकाल जाहीर झाला, त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आता त्याबाबतचा मुहूर्त ठरला असून, वेळ ठिकाणाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यासारख्या मोठ्या शहरांसह सर्वच महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
कधी निघणार सोडत?

नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात 22 जानेवारीला सकाळी 11 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदेगटाने एकत्रितपणे लढत दिली होती. निकालांनुसार भाजपाचे 89 तर शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली.

















