महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३० नोव्हेंबर : राज्यात 5 तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होईल असं कळतंय. मुख्यमंत्र्यांसह किमान 20 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
त्याआधी दिल्लीच्या बैठकीत खाते वाटपावरही खलबतं झाली आहेत. भाजप एकनाथ शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नाही. तर नगरविकास खातं सोडण्यास तयार आहे..त्यासोबत केंद्रात एक मंत्रिपद देण्याचीही भाजपची तयारी आहे.
अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खातं देण्यावरही एकमत झालं आहे. तसंच केंद्रात राष्ट्रवादीलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. भाजपच्या वाट्याला कोणतीही खाती जाऊ शकतात ते पाहुयात.
फडणवीस स्वत:कडे गृहखातं ठेवणार आहेत. त्यासोबत सामान्य प्रशासन, महसूल, ऊर्जा खातं, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वनखातं, ओबीसी मंत्रालय, पर्यटन खातं भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला कोणती खाती मिळू शकतात.
नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग मंत्रालय, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, शिक्षण, सांस्कृतिक विभाग
सध्या जी खाती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे होतीच. तीच खाती पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आहे. ज्यात अर्थ खातं, मदत आणि पुनर्वसन, सहकार खातं, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास मंत्रालय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात.
महायुतीत काही आमदारांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळू शकते. मंगलप्रभात लोढा यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे. त्यांच्यासह प्रताप सरनाईक, भरत गोगावले, अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार, गणेश नाईक यांचीही नावे चर्चेत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मुंबईतील आमदारांना मंत्रिपद दिली जाऊ शकतात.
वर्षा निवासस्थानी आणि सागर बंगल्यावर आमदारांची रिघ लागली आहे. अनेक नेते मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे आता कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे ५ तारखेला कळणार आहे.