महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ सप्टेंबर) : पिंपरी-चिंचवडमधील वाकडच्या फिनिक्स मॉल समोर हवेत गोळीबार करणाऱ्या बाला शिंदे नावाच्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय उर्फ बाला लहू शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माथाडीचं काम न मिळाल्यामुळे हवेत गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. अक्षय उर्फ बाला शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे.
मंगळवारी वाकड परिसरात असणाऱ्या फिनिक्स मॉल गेट नंबर सात या ठिकाणी बाला शिंदे याने हवेत गोळी झाडून दहशत पसरवली होती. गणपती विसर्जनाच्या दिवशी घटना घडल्याने पोलिसांची देखील धावपळ झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही ताब्यात घेऊन आरोपीचा अवघ्या काही तासांत शोध लावला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि कारचालक रणजीत नथुराम सलगर याला देखील गुन्हे शाखा युनिट चारने भुमकर चौकातून अटक केली आहे. हा गोळीबार माथाडीचं काम न मिळाल्यामुळे केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हवेत गोळीबार करून आरोपी बाला शिंदेने दहशत निर्माण केली होती. तशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.
