महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर (अण्णा) गावडे कामगार भवन येथे आज शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्त प्रशासनाने जोरदार तयारी केली असल्याचे आज दिसून आले .
शुक्रवारी (ता. २२) मतमोजणी कक्ष तयार ठेवला असून, त्यात उमेदवारांच्या प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, इतर राहिलेली छोटी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कॉम्पुटर तसेच प्रिंटर कामकाजासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या चारही बाजूने पोलिसांचा तसेच केंद्रीय पोलिस बल जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचा मतदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीने चुरस निर्माण झाली आहे. तब्बल 3 लाख 87 हजार 520 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2019 च्या तुलनेत तब्बल 1 लाख 9 हजार 770 अधिक मतदान झाले आहे.
चिंचवड मतदारसंघात 3 लाख 48 हजार 450 पुरुष, 3 लाख 15 हजार 115 महिला, 57 इतर असे 6 लाख 63 हजार 622 मतदार आहेत. यापैकी 2 लाख 3 हजार 781 पुरुष, 1 लाख 83 हजार 724 महिला, 15 इतर अशा 3 लाख 87 हजार 520 (58.39%) मतदारांनी मतदान केले.
चिंचवड मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे, अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. वाढलेल्या मतदानामुळे कोणाला धक्का बसणार? हे शनिवारीच स्पष्ट होईल. यात दोन-सव्वा दोन लाख मतदान घेणारा उमेदवार विजयी होणार …. तत्पूर्वी जगताप समर्थकांकडून आपल्या नेत्याला आमदारकीच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे.