महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१ मार्च – राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज केली. राज्याचे अर्थमंत्री लवकरच त्यासाठी आवश्यक तरतूद करून घोषणा करतील, असेही त्यांनी सांगितले.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरात त्यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाद्वारे लक्ष्मणभाऊंना योग्य श्रद्धांजली वाहण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदनावर दोन दिवस झालेल्या या शिबिराचा लाभ १ लाख २१ हजार ५२३ जणांनी घेतला.

अटल महाआरोग्य शिबिरास राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार उमा खापरे, , माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे तसेच शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, राजेंद्र राजापुरे, शशिकांत कदम, डॉ. देविदास शेलार, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, बाबा त्रिभुवन, चेतन भुजबळ, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, आरती चोंधे, उषा मुंडे, निर्मला कुटे, योगिता नागरगोजे, महेश जगताप, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, काळूराम नढे, शेखर चिंचवडे, संतोष ढोरे, माऊली जगताप, सविता खुळे, नरेश खुळे, डॉ. नागनाथ यंपल्ले, डॉ. अनिल संतपुरे, डॉ. अनिल बिऱ्हाडे, डॉ. धृती दीपा पोतदार, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. सिमरन थोरात, डॉ. रोशन मराठे, डॉ. ननवरे, गणेश बँकेचे संचालक अभय नरडवेकर, कविता दळवी, पल्लवी मारकड आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी आमदार शंकर जगताप यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व अधोरेखित केले होते, याचाही आबिटकर यांनी उल्लेख केला.
पंकजा मुंडे यांनी दिला लक्ष्मणभाऊंच्या आठवणींना उजाळा
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. मतदार संघाच्या विकासाबरोबरच लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा लोकप्रतिनिधी मिळणे हे भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “मी लक्ष्मणभाऊंसोबत काम केले आहे आणि आमदार शंकर जगताप यांच्या कार्यशैलीत त्यांची झलक दिसते.”
मुंडे यांनी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाकार्य करणाऱ्या संघटनांचे अभिनंदन केले आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर झालेल्या या शिबिरात एकूण १,२१,५२३ नागरिक सहभागी झाले. शिबिराच्या पहिल्या दिवशी काल ४८,७६३ नागरिकांनी लाभ घेतला होता. शिबिरात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले.
हे महाआरोग्य शिबिर महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे मुख्य संयोजक आणि पिंपरी-चिंचवड भाजप अध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी ही माहिती दिली.
मोफत आरोग्य सुविधा आणि तपासण्या
शिबिरात खालील मोफत वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत:
कॅन्सर तपासणी
सोनोग्राफी
एक्स-रे
रक्त तपासण्या
डायलिसिस
नेत्ररोग तपासणी
कृत्रिम अवयव वाटप
हृदय रोग, किडनी विकार, लिव्हर प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार
हाडांचे विकार, स्त्रीरोग, बालरोग, न्यूरोथेरेपी, आयुर्वेदिक उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया
प्रमुख रुग्णालयांचा सहभाग
या शिबिरात राज्यातील अनेक नामांकित रुग्णालये सहभागी झाली आहेत, त्यामध्ये ससून हॉस्पिटल, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल आणि रुबी हॉस्पिटल यांचा समावेश आहे.