Google Ad
Editor Choice

राजकारणातील सर्वसमावेशक ‘ राजा ‘ म्हणजेच शरद गोविंदराव पवार .. !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ डिसेंबर) : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात जवळ जवळ सहा – सात दशकांपासून ‘शरद पवार’ या नावाचा दबदबा आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित आहे. राजकारणात तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही असं म्हणावं लागेल.

त्यांच्या प्रत्येक कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेले आहे.

Google Ad

राष्ट्रीय पातळीवर अनुभव आणि कृषी, उद्योग, खेळ, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची खडान् खडा माहिती असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे, की आपल्याकडे राजकीय मतभेद असतात; परंतु मनभेद कधीच नसतात. सुरुवातीपासूनचे हे ‘कल्चर’ आजही कायम आहे. शरद पवार साहेबांचा अनेक विषयांतील अभ्यास, अनुभव लक्षात घेता, त्यांच्याकडे सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. अशा या अनुभवी आणि चलाख योध्याला आज ८१ वर्ष पूर्ण झाली.

पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात रहातात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार नावाने ओळखतात एवढ्या आनंदातच ते त्यांचे कधी होतात हे त्यांनाही कळत नाही. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू रहात नाही. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री आहे.अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत.

रतन टाटा असो वा राहूल बजाज किंवा अनिल, मुकेश अंबानी असो वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. पण नाट्य क्षेत्रातील जब्बार पटेल, मोहन आगाशे, मोहन जोशी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत.

शेतकरी, कामगार, मजूर, शिक्षक, मध्यमवर्गीय, दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, उद्योजक आणि सर्व पक्षातील राजकारणी या सर्वांना शरद पवार आपले वाटतात, जवळचे वाटतात, हेच त्यांच्या आजवरच्या जगण्याचे फलित आहे. शरद पवारांबरोबर अनेकांचे राजकीय मतभेद आहेत; परंतु त्यांनी कधीही कुणाला मदत करताना, मार्गदर्शन करताना ते मतभेद आडवे येऊ दिले नाहीत. अशा उमद्या मनाचे लोकनेते शरद पवार ८१ वर्षांचे होत आहेत. आजही ते त्याच जोमाने कार्यरत आहेत, याचे कौतुक सर्वांना आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!