महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ ऑगस्ट) : आज ०९ ऑगस्ट पुण्यातील ‘ऐश्वर्य कट्ट्यावर’ क्रांतीदिनी हुतात्म्यांचे स्मरण आणि हास्यमैफीलीचे आनंदधन पहायला मिळाले, निमित्त होते अप्पा रेणूसे यांनी आयोजित केलेल्या ०९ ऑगस्ट या क्रांती दिनाचे, विभिन्न विचारधारा, उद्दिष्ट आणि भूमिका घेऊन वावरणारी, आपापल्या राजकीय जीवनात कर्तृत्वाची उंची गाठलेली मोठी माणसं पण ऐश्वर्य कट्ट्यावर मात्र मित्रांसारखी बोलती झाली आणि हास्याचे असंख्य फवारे उडाले. गप्पांची आणि किश्श्यांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. आजच्या दिवसाचे आणखी एक औचित्य म्हणजे क्रांतीदिन. या निमित्ताने शहीद क्रांतीकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू क्रांतीकारकांचे स्मरण करून आणि नंदिनी लांडे या मुलीने साकारलेल्या भारतमातेला वंदन करून आजच्या कट्ट्याची सुरुवात झाली.
‘अप्पा रेणूसे’ यांनी आयोजित केलेल्या आजचे कट्ट्याचे मानकरी होते, भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मा. धीरज घाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे हे राजकीय धुरंधर आणि त्यांच्याबरोबरीने सामाजिक कामांत अग्रेसर असणारे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष अविनाश चोरडिया, माजी आमदार विलासराव लांडे यांनी पिंपरी चिंचवडचे राजकारण, कै. लक्ष्मणराव जगताप यांच्याशी असणारे दृढ ऋणानुबंध या आठवणी उलगडतानाच राजकीय किस्से सांगून अक्षरश: धमाल उडवून दिली. रमेशबापू कोंडे यांनीही ग्रामीण भागातील राजकारण आणि त्यातील हातखंडे सांगताना अनेक गंमतीशीर किस्से सांगितले. धीरजजी घाटे यांनी त्यांची राजकीय जीवनातील वाटचाल आणि सध्याच्या नव्या जबाबदारीपुढील आव्हाने सांगितली. तर अविनाशजी चोरडियांनी त्यांचे सामाजिक व व्यावसायिक विश्वातील अनुभव सांगितले. वंदे मातरमने मैफिलीची सांगता झाली. या वेळी गिरे भेळचे संचालक राजूशेठ गिरे यांची विशेष उपस्थिती होती.
या निमित्ताने उपस्थित सर्व मानकरींचे औक्षण करून त्यांना शाल, शिंदेशाही पगडी, मोत्याची माळ, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, तसेच इतर सर्व उपस्थितांनी गांधी टोपी परिधान करून भारत मातेचा बॅच छातीवर लावून भारत मातेला वंदन केले.
या प्रसंगी अप्पा रेणूसे, विलासराव भणगे, पराग पोतदार, रवींद्र संचेती, अॅड. दिलीप जगताप, मधुकर कोंढरे, सचिन डिंबळे, शंकरराव कडू, नेमीचंद सोळंकी, विराज रेणुसे, आकाश वाडघरे, संदीप फडके, महावीर डाकलिया,मंगेश साळुंके, संदीप भोसले, सुनील सोनवणे, अक्षय लिमन, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर आदी अप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होता.