महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : आगामी लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha Elections 2024) बिगुल वाजले असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पुण्यामध्ये देखील निवडणूक उमेदवारांची तयारी सुरु झाली असून मतदारांशी संवाद वाढवण्याचे प्रयत्न सध्या अनेक इच्छुक करत आहेत. दरम्यान, कसबा पोटनिवडणूकीमध्ये भाजपला घाम फोडणारे रवींद्र धंगेकर हे देखील आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत आणि यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी इच्छुकांना धक्का बसला असून भाजपाचे देखील टेन्शन वाढले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस पक्षाने पुण्यामध्ये चाचपणी सुरु केली असून इच्छुकांचे अर्ज देखील मागवले होते. यावेळी पुण्यातून 20 अर्ज आले आहेत. यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा देखील समावेश आहे. यामध्ये मोहन जोशी यांची उमेदवार म्हणून वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात असताना रवींद्र धंगेकर यांनी राजकीय खेळी खेळली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी धंगेकरांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून दिल्लीमध्ये देखील भेटीगाठी घेतल्या आहेत.
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मागील आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये वारी केली. यावेळी त्यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुण्यामध्ये धंगेकरांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये कुजबूज सुरु झाली असून अनेकांना धंगेकरांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे. धंगेकर यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यामुळे अनेक कॉंग्रेस इच्छुकांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे. तसेच पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तर कसबा पोटनिवडणूकीची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजपमध्ये आहे.
भाजपला अद्याप पुण्यातील लोकसभेसाठी उमेदवार निश्चत करता आलेला नाही. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली तर भाजपच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. धंगेकर यांची मतदारांशी असणारी ओळख व मतदारांसाठी त्यांचा ओळखीचा चेहरा या बाबी भाजपला डोकेदुखी ठरत आहे. पोटनिवडणूकीमध्ये हारल्यानंतर भाजप आता सावधतेने पाऊले उचलत आहेत. तसेच दुसऱ्या बाजुला आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘आपल्या प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा लावूया’ या उपक्रमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात देखील केली आहे.