महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : एक ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे.
त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसामुळं पुण्याच्या ग्रामीण भागातल्या अनेक नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळं वरुणराजाचं पुनरागमन झाल्याने आनंद व्यक्त करावा की पावसामुळं शेतीचं नुकसान झालं, याचा शोक व्यक्त करावा, असा प्रश्न पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजेपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. तीन वाजता सुरू झालेला पाऊस संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत सुरू होता. आंबेगाव तालुक्यातील काठापूर मध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी अनेक शेतातील बांध फुटले असून उभी पीकं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. शेतीपिकांचं नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून बळीराजाला आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
महिन्याभरानंतर वरुणराजाचं आगमन झाल्याने आम्ही समाधानी आहोत, परंतु या पावसामुळं शेतीपिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उगवत असलेली पीकं नाहीशी झाली आहे. हाती आलेल्या पिकांनाही पावसामुळं मोठा झटका बसला आहे. याशिवाय अनेक नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे देखील पिकांचं नुकसान होत असल्याची भावना आंबेगावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.