महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० सप्टेंबर) : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलंय. सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात आक्रमक निदर्शनं यावेळी करण्यात आली. परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुणे विद्यापीठात अभाविपच्या वतीने ‘रुग्णवाहिका प्रतिकात्मक’ आंदोलन यावेळी करण्यात आलं. चुकीच्या पद्धतीने निकाल लावल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोनल केलं.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर रुग्णवाहिका आंदोलकांनी आणली. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परीक्षा विभागावर उपचार करण्याची गरज आहे, असं म्हणत प्रतिकात्मक टीका करण्यात आली. परीक्षांचे निकाल लावताना घोळ केला जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं. प्रभारी आणि कुलगुरु यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले होते.
