महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २३ ऑक्टोबर २०२३:-* २०२१ पासून न्यायवैद्यकशास्त्र विभागातील शवविच्छेदन केल्यानंतर मानवी अवयवांचे नमुने तपासणीकरिता पदव्युत्तर संस्थेत येण्यास सुरूवात झाली. या सर्व बाबींमुळे पदव्युत्तर संस्थेतील विकृतीशास्त्र विभागातील तपासणी संख्येत वाढ झाली आहे. यामुळे विकृतीशास्त्र विभाग व मध्यवर्ती प्रयोगशाळेत येणाऱ्या प्रत्येक उपविभागात स्वयंचलित उपकरणे आणण्यात आली असून त्याद्वारे रुग्णांना व नातेवाईकांना त्यांच्या विविध तपासण्यांचे अचूक अहवाल त्वरित उपलब्ध करून देणे शक्य झाले. हिमॅटोलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सायटोलॉजी व ऑटोप्सी या सर्व विषयांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे व विविध स्वयंचलित उपकरणांद्वारे बिनचुक अहवाल प्राप्त होत असून रोगनिदान करण्यात ते विकृतीशास्त्र विभागात मोलाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख पॅथोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागातील यंत्र तसेच साहित्यांची पूजा करण्यात आली. यामध्ये फुली ऑटोमॅटिक टिश्यु प्रोसेसर, पेंटा हेड मायक्रोस्कोप, ग्रॉसिंग वर्कस्टेशन इत्यादी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉ. तुषार पाटील यांनी प्रयोगशाळेतील साहित्य यंत्रसामग्रीची पूजा केली यावेळी त्यांनी प्रयोगशाळेबाबत माहिती दिली.
या पुजन प्रसंगी जीवरसायनशास्त्र तज्ञ डॉ. मीना सोनावणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते.
प्रयोगशाळेतील हिस्टोपॅथोलोजी, हिमॅटोलोजी, बायोकेमिस्ट्री या विभागात प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची पुजा करण्यात आली. या विभागांमध्ये रक्त, लघवी, थुंकी यांसह शस्त्रक्रियेनंतरच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर पुढील वैद्यकीय उपचाराची दिशा ठरवली जाते. २०१९ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पदव्युत्तर संस्था सुरू झाली. सुरूवातीस सात विषयांमध्ये एकूण वार्षिक २४ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर २०२० मध्ये सर्जरी व मेडिसीन विभागात प्रत्येकी वार्षिक प्रत्येकी सहा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला व २०२३ पासून कम्युनिटी मेडिसीन, नेत्ररोग, त्वचारोग, श्वसनरोग विभाग या विषयांमध्ये वार्षिक १२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास सुरूवात झाली. हिस्टोपॅथोलॉजी विभागात पुर्वी वार्षिक २ हजार ५०० मानवी अवयवांचे नमुने तपासणीकरिता येत होते. हे सर्व काम पुर्वी मॅन्युअल पद्धतीने होत होते. त्यामुळे स्लाईड तयार होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. परंतु आता स्वयंचलित उपकरणे आल्याने वार्षिक ४ हजार ५०० ते ५ हजार नमुने प्रक्रिया करून कमी वेळेत अहवाल शक्य झाली असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली तसेच शवविच्छेदन झाल्यानंतर तपासणीसाठी येणाऱे वार्षिक ४५० ते ५०० मानवी अवयवांचे नमुने आता वेळेत प्रक्रिया होत आहेत व त्याचा अहवाल पोलीस विभागाला देणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.
प्रयोगशाळा हा अत्यंत महत्त्वाचा एक भाग असून यामध्ये रक्त नमुन्यापासून ते गंभीर आजाराच्या रुग्णांपर्यंत विविध तपासण्या करण्यात येतात. प्रयोगशाळेतील नमुने तपासणी यंत्रणा ही महिन्याला सरासरी १ लाखापेक्षा जास्त नमुने तपासून अहवाल देत असून स्वयंचलित यंत्रणेमुळे हे काम सुलभतेने होत असल्याची माहिती जीवरसायनशास्त्र तंत्रज्ञ डॉ. मीना सोनावणे यांनी दिली.
प्रयोगशाळेचे, यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण पार पाडण्यासाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त तसेच अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे डॉ. तुषार पाटील आभार व्यक्त करताना म्हणाले.