महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १२ डिसेंबर २०२३ : भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला पिंपरी चिंचवड शहरात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना या माध्यमातून विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असून अशाप्रकारे थेट लाभ मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरु झाली आहे. शहरातील विविध ठिकाणी या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. चित्ररथाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफितीद्वारे दिली जात आहे. महापालिकेच्यावतीने शहराच्या प्रमुख ६७ ठिकाणी या यात्रेनिमित्त जनजागृती करण्यात येणार असून यामध्ये प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, आधार कार्ड अद्यावतीकरण, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती आणि लाभ देण्यासोबत आरोग्य शिबीराचे आयोजन केले जात आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेत लोकप्रतिनिधींसह विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभाग घेत असून नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग या कार्यक्रमाला मिळत आहे. १२ डिसेंबरपर्यंत शहरातील १५ ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. सर्व सामान्य नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ देणे तसेच विविध योजनांची माहिती चित्रफीत आणि हस्तपत्रकाच्या माध्यमातून दिली जात आहे. योजनांबद्दल आणि मिळालेल्या लाभाबद्दल नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पुढील सात दिवसांत पिंपरी चिंचवड शहरातील सृष्टी चौक व प्राथमिक शाळा पिंपळे गुरव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन व ओम हॉस्पीटल मागील परिसर भोसरी, शितलबाग, पीएमटी चौक व अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी, धर्मवीर संभाजी चौक व बैलगाडा घाट च-होली, महात्मा फुले प्राथमिक शाळा आकुर्डी, लुम्बीनी बुध्द विहार बोपखेल, प्राथमिक शाळा चिखली व म्हेत्रे वस्ती, बहुउददेशीय सभागृह पुर्णानगर, सांस्कृतिक केंद्र शिवतेज नगर, प्राथमिक शाळा रुपी नगर व तळवडे, ठाकरे मैदान यमुनानगर, सदगुरु उद्यान निगडी, ज्येष्ठ नागरिक हॉल माळीअळी व जय भारत तरुण मंडळ हॉल पिंपरी, बळीराज मंगल कार्यालय रहाटणी, तापकीर चौक काळेवाडी यशवंतराव चव्हाण शाळा मैदान थेरगाव या ठिकाणी ही यात्रा भेट देईल.
नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध कक्षांना भेट देऊन योजनांची माहिती जाणून घेवून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.