महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जुलै) : लाखो पुणेकरांचा प्रवास ज्या बसेसने होत असतो. त्या पुणे महानगर परिवहन महामंडळही (PMPML) अनेक नवनवीन प्रयोग करुन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. चालक, वाहकांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.
पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी नुकताच पदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर सर्वात पहिला प्रयोग त्यांनी बस चालक आणि वाहकांना शिस्त लावण्यासाठी सुरु केला. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: बसस्थानकावर उभे राहून सामान्याप्रमाणे बसने प्रवास केला. त्यावेळी बस स्थानकावर न थांबणे, चालक अन् वाहकांची वागणूक याचे चांगले, वाईट अनुभव त्यांना आला. त्यामुळे आता चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे.
पीएमपी अध्यक्षांचा बेशिस्त चालकांना दणका देण्यासाठी नवीन उपक्रम सुरु केला. त्यांनी बेशिस्त चालकांची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला 100 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्रप्रताप सिंह यांनी बेशिस्त बस चालकावर करणार कारवाई करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पदभार स्वीकारताचं त्यांनी हा निर्णय घेतला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चालक व वाहकांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पीएमपी प्रशासनला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात मोबाइलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे अशा प्रकारच्या तक्रारी असतात.
चालकाने केलेल्या बेशिस्तपणाबद्दल त्याच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करण्यात येणार आहे. यामधील रक्कम तक्रारदार प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, असे पीएमपीचे नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
▶️अशी करा तक्रार :-
■ प्रवाशांनी तक्रार करताना फोटो, व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख, वेळ अशी माहिती पीएमपीच्या http://complaints@ pmpml.orgया मेलवर पाठवावी, तसेच ९८८१४९५५८९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही तक्रार करता येईल. प्रवासी जवळच्या डेपोमध्येही पुराव्यानिशी तक्रार करू शकतात.