महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : – मालमत्ता करांची बिल मालमत्ताधारकांना घरोघरी जाऊन वाटपासाठी पिंपरी चिंचवड मनपा जे 90 लाख रुपये खर्च करणार आहे. हा निर्णय रद्द करून नागरिकांच्या टॅक्सरूपी पैशाची उधळपट्टी थांबवण्याबाबत शेखर सिंह आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांना चिखली मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मालमत्ताधारकांना त्यांची मालमत्ता देयके घरपोच करण्यासाठी शहरातील बचतगटांच्या मार्फत प्रत्येक बिलास 15 रु प्रमाणे पूर्ण शहरातील मालमत्ताधारकांच्या मालमत्ता बिल वितरणास एकुण 90 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे. मागच्या वर्षी हीच मालमत्ता बिल शहरातील सर्व मालमत्ताधारकांना पोस्टाने पाठवण्यासाठी 48 लाख रुपये खर्च केले होते. परंतु त्यातून महानगरपालिकेला मालमत्ता बिल सर्वांना घरपोच पाठवण्याचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही.
यासाठी नागरिकांचा पत्ता न भेटणे वगैरे अनेक कारण असतील पण हे नागरिकांचे 48 लाख रुपये व्यर्थ गेले. तसेच यावर्षी देखील आपण यासाठी 90 लाख रुपयाला मान्यता देऊन नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत आहात. आपल्या पिंपरी चिंचवड मनपाकडे एवढे कर्मचारी असताना त्यांना हे काम न लावता आपण शहरातील बचतगटांना हे काम देऊन नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत आहात. हे एकदम चुकीचे आहे. तरी कृपया आपणाला विनंती आहे की, आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कडून ही मालमत्ता बिल वितरीत करावीत आणि जर आपल्या करसंकलन विभागात कर्मचारी कमी असतील तर इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत ही बिल वितरीत करावीत व नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी ही विनंती करणारे निवेदन चिखली मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्री व महेशदादा लांडगे, आमदार भोसरी, विधानसभा यांना देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा,आयुक्त शेखर सिंह साहेब मालमत्ताकराच्या एक हजार कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत.आमच्या सोसायट्यांना ग्रीन सोसायटी अंतर्गत मालमत्ताकरात सवलत देण्यासाठी महानगरपालिका 60 लाख रुपये सूट देते, तर मालमत्ता बिलाचे वितरण करण्यासाठी 90 लाख रुपये खर्च करते. नवल याचे वाटते की मनपा आयुक्तांच्या या मनमानी कारभारा विरुद्ध आमदार महेशदादा लांडगे सोडून इतर कोणत्याही पक्षाचा नेता बोलत नाही, त्यांना विरोध करत नाही. आयुक्तांनी ही सर्व बिल पिंपरी चिंचवड मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत वाटावीत व पैशाचे उधळपट्टी थांबवावी.
संजीवन सांगळे, अध्यक्ष – चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन