महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ सप्टेंबर) : बैल पोळा हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये बैल पोळा सण साजरा करण्यासाठी विविध साहित्यानी दुकानें सजली आहेत. बैलपोळा हा शेतकरी आणि बैलांचे जिव्हाळ्याचे नाते घट्ट करणारा सण आहे. आपल्या कृषिप्रधान देशात बैलपोळ्याचा दिवस हा बळिराजासाठी आनंदाची पर्वणी असते.
पुणे जिल्ह्यात भाद्रपद महिन्यातील सर्वपित्री अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पोळा साधेपणाने साजरा केला होता. यंदा पाऊस चांगला झाल्याने व भाताचे पीकही उत्तम असल्याने बैलपोळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी बळीराजाने केली आहे. त्यात सोन्या ग्रुप बैलगाडा संघटना तसेच पिंपळे गुरवचे पोलिस पाटील चिराग जयसिंगदादा जगताप यांनीही आघाडी घेत जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. बैलगाडा शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या सोन्या नावाच्या बैलाला बैलपोळ्या करीता सजवण्यासाठी त्यांनी मोठी तयारी त्यांच्या गोठ्यावर केल्याचे दिसत आहे.

पाटील कुटुंबाच्या बैलांचे ग्रामदैवत मारुती मंदिरात पूजन करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर बैलपोळ्याला सुुुरुवात होते. बैल पोळ्यानिमित्त शेतकरी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून सजवून वाजतगाजत मिरवणूक काढतात.
यावर्षी लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा बैलपोळा सणाला बैलांना एकत्र आणण्यास व बैलांची मिरवणूक काढण्यास काही भागात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन दिलेल्या आदेशानुसार बैलपोळा सण साजरा करण्यात येणार आहे.