महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), या डॉक्टर्स असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला. पर्यावरणामुळे आपले जीवन अधिक सुंदर आणि सुरक्षित होईल व हे जग अधिकाधिक सुंदर बनेल, आणि युवा पिढीला त्याचा चांगला उपयोग होईल, या पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात आपल्या आरोग्यासाठी पर्यावरण कसे सुरक्षित राहील याची काळजी घेतली पाहिजे.
NIMA प्रतिनिधीमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सहआयुक्त श्री. सचिन पवार आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख श्री. संजय कुलकर्णी यांना एक महत्त्वाचे निवेदन सादर केले. या निवेदनात पर्यावरणाला गंभीर इजा करणाऱ्या तसेच आरोग्याला अत्यंत हानिकारक प्लास्टिक आणि इतर घातक साहित्यावर कठोर बंदी घालावी तसेच अनावश्यक प्लास्टिक उत्पादन पूर्णपणे थांबवण्यासाठी शासनस्तरावर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाला पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील अनेक डॉक्टर संघटनांनी पाठिंबा दिला.

या प्रसंगी सहआयुक्त श्री. सचिन पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी शहराला “कचरा मुक्त” करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांबाबत आपली कटिबद्धता व्यक्त केली आणि भविष्यात NIMA संस्थेसोबत एकत्र येऊन पर्यावरणीय प्रकल्पांवर सामूहिकरीत्या काम करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमावेळी NIMA पिंपरी-चिंचवड पर्यावरण समितीच्या डॉ. स्वाती भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली, NIMA महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. सुहास जाधव, पिंपरी-चिंचवड शाखेचे सेक्रेटरी डॉ. रमेश केदार, कोषाध्यक्ष डॉ. सुनील भोए, विमा फोरमच्या अध्यक्षा डॉ. हेमा चंद्रशेखर, माजी अध्यक्ष डॉ. प्रज्ञा खोसे, विमा फोरमच्या सेक्रेटरी डॉ. मयुरी मोरे, डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
NIMA पिंपरी-चिंचवडच्या वतीने पर्यावरण व समाजाचे आरोग्य रक्षणासाठी उचलण्यात आलेला हा पुढाकार जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे!
*महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन, ५ ऑगस्टपर्यंत सहभागाची संधी*
पिंपरी, ३० जुलै २०२५: पिंपरी चिंचवडला स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ स्पर्धेची तयारी पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. या अनुषंगाने महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत स्वच्छतेचा नवा चेहरा शोधण्यासाठी मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत आहे. ही स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेतील विजेत्यास आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून, विजेत्या डिझाईनचा वापर महापालिकेच्या सर्व अधिकृत माध्यमांवर केला जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
…….
*स्पर्धेचे नियम:*
एक व्यक्ती फक्त एक डिझाईन पाठवू शकते.
डिझाईन पूर्णतः मूळ व स्वयंनिर्मित असावे.
मॅस्कॉटमध्ये स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, नागरिक सहभाग, प्लास्टिकमुक्ती, कचरा विलगीकरण आदी विषयांचा समावेश असावा.
डिझाईन प्रेरणादायी, संस्कृतीशी सुसंगत असावे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
…..
*असा घ्या स्पर्धेत सहभाग*
https://forms.gle/K7L2hN6eS4V3LYto6 या संकेतस्थळावर जाऊन स्पर्धेसाठीचा ऑनलाइन अर्ज भरावा.
नाव, ई-मेल, मोबाईल, पत्ता ही माहिती भरून मॅस्कॉट डिझाईन अपलोड करावे.
डिझाईन मागची संकल्पना थोडक्यात लिहावी आणि अर्ज सबमिट करावा.


