महाराष्ट्र 14 न्यूज,दि. २ ऑगस्ट २०२३:- साहित्याच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार, उपेक्षितांचा आवाज, वेदना आणि अन्यायाला वाचा फोडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात प्रबोधनाचा नवा मानदंड निर्माण केला. त्यांच्या परिवर्तनशील विचारांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन महापालिका अतिरीक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानकाशेजारील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारप्रबोधन पर्वाचे उद्घाटन महापालिका अतिरीक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटनप्रसंगी आमदार महेश लांडगे, माजी नगरसदस्य व भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, किसन नेटके,प्रल्हाद सुधारे, राजू दुर्गे, नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, सुमन नेटके, निकीता कदम, अनुराधा गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, या विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात सकाळी पारंपरिक सनई वादनाने झाली. हलगीवादनाच्या जुगलबंदीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांनी स्वरचंदन हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रमाचा सादर केला. त्यानंतर वेदांत महाजन यांनी जागर महापुरुषांच्या विचारांचा कार्यक्रमांमधून नागरिकांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
दुपारी २ वाजता विविध बँड पथकांमध्ये “बँड स्पर्धा” रंगल्या. प्रत्येक बँड पथकाने आपली कला उपस्थितांसमोर सादर केली. सायंकाळी ४ वाजता अनिकेत जवळेकर यांचा “सुवर्ण लहरी” हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर साजन बोंद्रे व विशाल प्रस्तुत प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रमातून नागरिकांचे मनोरंजनातून प्रबोधन केले. कुणाल कांबळे यांच्या अण्णा तुमच्यासाठी या कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
असे असणार कार्यक्रम :-
आज ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता कीर्तनकार ह. भ. प. बाजीराव बांगर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वाजता ‘शांताबाई फेम’ संजय लोंढे व प्रभू जाचक यांचा प्रबोधनात्मक गीत गाण्याचा कार्यक्रम त्यानंतर ११.३० वाजता रमेश परूळेकर यांचा महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम होणार आहे. पुढील सत्रात सिने अभिनेत्री, व्याख्यात्या गुरमीता कौर यांचे महिलांना विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी १ वाजता अक्षय डाडर व लखन अडागळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता छाया मोरे आणि पार्टी यांचा गीतगाण्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि वंचित समाज’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे यामध्ये शिक्षक आयुक्त सुरज मांढरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, फर्ग्युसन कॉलेजचे आनंद काठीकार, वाडिया कॉलेजच्या डॉ. वृषाली रणधीर, यशदा पुणेचे डॉ. बबन जोगदंड, संदिपान झोंबाडे यांचा सहभाग आहे.
५.३० वाजता रामलिंग जाधव यांचा गीतगाण्याचा कार्यक्रम तसेच ७ वाजता वर्षा रायकर यांचा पारंपारिक लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. राजू जाधव व रवींद्र खोमणे यांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे