Google Ad
Editor Choice

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार जगातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांतून ‘स्वराज्य ध्वज यात्रा’ … कसा आहे, भगवा …

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : भगवा ध्वज खांद्यावर घेऊन मिरवणे, रथयात्रा काढणे ही खरे तर शिवसेना-भाजपमधील राजकीय संस्कृती. परंतु याला छेद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार जगातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांतून ‘स्वराज्य ध्वज यात्रा’ आयोजित केली.

Google Ad

या यात्रेचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी स्वागत समारंभ आयोजित केले. आता हा ध्वज आज, शुक्रवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक खर्डा (ता. जामखेड, नगर) येथील शिवपट्टण किल्ल्याच्या आवारात उभारला जाणार आहे. या निमित्ताने आमदार रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्वावर शिक्कामोर्तब घडवून येण्यास मदत होणार आहे.
प्रचलित राजकारणापेक्षा वेगळी पठडी स्वीकारत, सुशिक्षित राजकारणी व्यक्तित्वाचा पैलू दाखवत आमदार पवार यांनी गेल्या २५ वर्षांपासून भाजपच्या वर्चस्वाखाली असलेला कर्जत-जामखेड मतदारसंघ गेल्या विधानसभा निवडणुकीतून हिसकावून घेतला. त्यापूर्वी ‘बारामती अ‍ॅग्रो’च्या माध्यमातून पवार कुटुंबीयांनी पद्धतशीर बांधणी केली. यामध्ये आ. पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार अधिक सक्रिय राहिल्या.

नगर जिल्ह्य़ाच्या एका टोकाला असलेले कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तसे ‘बारामती’ला जवळचे. निवडणुकीसाठी आणि इतर वेळीही आमदार रोहित पवार हे पक्षाच्या यंत्रणेवर फारसे अवलंबून राहात नाहीत किंवा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला त्यांच्या गाडीत स्थान मिळतही नाही. कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊनही ते फिरत नाहीत. त्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.

तरुणांना आकर्षित करण्याकडे त्यांचा कल असतो, त्यासाठी ते वेगवेगळे फंडे वापरतात. स्वराज्य ध्वज यात्रेपासूनही त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना लांबच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अशीच जामखेडमधील नदीकाठी महादेवाची टोलेजंग मूर्तीची प्रतिष्ठापना करून चर्चा घडवून आणली.
स्वराज्य ध्वज यात्रेपूर्वी काही दिवस आधी त्यांनी दिल्लीत जाऊन १२ केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. महाराष्ट्रासह सहा राज्यांत स्वराज्य ध्वज यात्रा नेण्यात आली. यानिमित्ताने राजकीय वारसदाराच्या शर्यतीमधील आणखी एका युवा नेतृत्वाचा महाराष्ट्राला आणि राज्याबाहेरही परिचय झाला.

पक्षांतर्गत स्थान मिळवण्यातही हे सर्व उपक्रम मदत करणारेच ठरणार आहेत.
ध्वज यात्रा काढून भगवा मिरवणे, धार्मिक स्थळांच्या भेटी, संतपीठांचे आशीर्वाद यांसारख्या घटनांना शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनात स्थान दिले नाही. त्यांचा वारसा सांगणारा, त्यांच्याच पक्षातील नातू याच गोष्टीचा आधार घेत आहे, ही बाब चर्चेची ठरत आहे. चौकटीबाहेर जाऊन निवडणुकीचे राजकारण करण्याच्या, हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांची ही सुरुवात असू शकते.

कार्यक्रमाला किमान एक लाख नागरिक उपस्थित राहातील असे नियोजन करण्यात आले आहे. उपस्थितीसाठी दोन दिवसांपूर्वी ६३ हजार जणांनी नावनोंदणी केल्याचा दावा आयोजक करत आहेत. करोना नियंत्रित होत नसल्याने जिल्ह्य़ातील ६९ गावांत टाळेबंदी लावली गेली असताना अशा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम धडकी भरवणारा ठरू शकतो.

पानिपतच्या लढाईत मराठय़ांचा पराभव झाल्यानंतर खर्डामध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत मराठे पुन्हा एकत्र आले होते. १७९५ मध्ये ही लढाई झाली. एकत्रित मराठय़ांनी निजामाचा पराभव केला. मराठय़ांचा हा शेवटचा विजय ठरला. लढाईपूर्वी धार्मिक अनुष्ठान घालण्याची मराठा सरदारांची परंपरा होती. त्या वेळी लढाई निजामाविरुद्ध होती. आता खडर्य़ातील ध्वजरोहणाच्या अनुष्ठानानंतर कोणाविरुद्ध आमदार पवार रणशिंग फुंकणार? लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेसह बाजार समितींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. परंतु इतक्या छोटय़ा उद्दिष्टांसाठी भव्य, शक्तिप्रदर्शनाचा घाट निश्चितच घातला जाणार नाही. आगामी काळात भगवा केवळ ‘तुमचा’ नाहीतर तो ‘आमचा’ही आहे, या संदेशाचा प्रसार राष्ट्रवादी करणार का? हे काळच ठरवेल.

स्वराज्य ध्वजयात्रा सहा राज्यांत
‘ ९ सप्टेंबरला कर्जतमधून सुरुवात
‘ महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, सहा राज्यांत १२ हजार कि.मी. प्रवास करून ३ ऑक्टोबरला पुन्हा कर्जतला
‘ यात्रेत ७४ धार्मिक स्थळांच्या भेटीत संतपीठातील संतांकडून ध्वजाचे पूजन
‘ राज्याबाहेर श्रीराम मंदिर (आयोध्या), मथुरा, बोधगया, केदारनाथ, उत्तराखंड, आग्रा किल्ला, अजमेर शरीफ, श्रीमंत सयाजीराव गायकवाड संस्थान, बडोदा, आदी ठिकाणी ध्वज नेण्यात आला.
* नंतर परतल्यावर कर्जत आणि जामखेडमधील गावगावात नेण्यात आला.
* ध्वजाची उंची ७४ मीटर, वजन ९० किलो
* १८ टन वजनाच्या खांबावर उभारला जाणार
स्वराज्य यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम नाही. भगवा ध्वज हा प्रेरणा समता एकता संदेश देणारा आहे. ठरावीक वेगळ्या रंगाचा म्हणून वेगळा अर्थ न काढता त्याकडे सकारात्मक पाहावे. भगवा ध्वज कोणा राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. भगव्यासमोर नतमस्तक होणे, मंदिरात जाणे ही माझी व्यक्तिगत भावना आहे, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. कार्यक्रमास उपस्थित राहाणाऱ्यांना करुणा प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सूचना दिली आहे. जगातील सर्वात उंचावर फडकणारा हा भगवा ध्वज असेल

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!