महाराष्ट्र 14 न्यूज : टीम इंडियाने थरारक झालेल्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली. टीम इंडियाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे रहाणेने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या आणि युवा खेळाडूंना सोबत घेत शानदार विजय मिळवला. अजिंक्यने नेतृत्व कसं असायला हवं? याचं उत्कृष्ट उदाहरण या मालिकेतून जगासमोर मांडलं. दरम्यान ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयामुळे जगभरातील क्रिकेटरसिक, सेलिब्रेटी, नेतेमंडळी भारतीय संघाचं, संघातील खेळाडूंचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचं कौतुक करत आहेत.
राज्याचे महसूलमंत्री आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनीदेखील अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं आहे. थोरात म्हणाले की, सगळ्या भारतीयांसाठी आणि संगमनेरवासियांसाठी आज आनंदाचा क्षण आहे. अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकणं आणि इतिहास रचणं हे अभूतपूर्व आहे. शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील त्याचे नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो, हे अजिंक्य रहाणे यांनी आज जगाला दाखवून दिलं आहे.

थोरात म्हणाले की, यापूर्वी अनेक वेळा अजिंक्य रहाणेंना डावलण्यात आलं, योग्य संधी दिली गेली नाही. प्रत्येक वेळी आम्हाला दुःख झालं. परंतु त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आज त्यांनी त्यांच्यातले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. अजिंक्य रहाणेंचा प्रवास ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे. आज मी त्यांचे आणि त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन करतो.
अजिंक्य रहाणे हा मुळचा महाराष्ट्रातील अहमदनगरमधील संगमनेरचा आहे. आपल्या नगरातील मातीतल्या अजिंक्यने भारताला कसोटी मालिका जिंकून दिल्याने संगमनेरमध्येही आनंदाचं वातावरण आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर दिग्गज नेत्यांनीही कौतुक केलं.
रहाणे नावाप्रमाणे ‘अजिंक्य’
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. रहाणेने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. रहाणेचा कॅपटन्सी रेकॉर्ड भन्नाट आहे. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटीमध्ये आतापर्यंत ‘अजिंक्य’ आहे. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा चौथा कसोटी विजय ठरला. रहाणेने आतापर्यंत 5 कसोटींमध्ये नेतृत्व केलं आहे. यापैकी 4 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एक सामना हा अनिर्णित राहिला आहे.
8 Comments