Google Ad
Uncategorized

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक परकीय आक्रमकांना तोंड देऊन पहिल्या स्वराज्याची स्थापना ही आपल्याच महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रावर होणारे अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची ताकद आपल्याला इथल्या मातीने दिली आहे. 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्गठन अधिनियम लागू होऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. 

स्वातंत्र्यानंतर भारतातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर पुनर्रचित केली गेली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ महत्त्वपूर्ण ठरली. या चळवळीत 106 आंदोलक हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानामुळे 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

Google Ad

चळवळीमध्ये आचार्य अत्रे यांचा सिंहाचा वाटा

स्वातंत्र्यानंतर मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्याय वाढत गेला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या चळवळीमध्ये आचार्य अत्रे यांचा देखील सिंहाचा वाटा होता. ते एक सुप्रसिद्ध लेखक, वक्ते, नाटककार, पत्रकार आणि राजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीत अतिशय प्रभावी भूमिका बजावली होती. आचार्य अत्रे यांचं व्यक्तिमत्व हे अफाट होतं. त्यांच्यामध्ये रोखठोकपणा हा स्वभाव गुण होता. ते नेहमी त्यांच्या लेखणीने आणि त्यांच्या भाषणांनी विरोधकांना घायाळ कस करायचं हे आचार्य अत्रे यांच्याकडे बघितल्यानंतर समजायचे. महाराष्ट्रात आपल्या लेखणीने आणि वाणीने साप्ताहिक नवयुग आणि नंतर दैनिक मराठा या वृत्तपत्रांमधून रान पेटवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते आचार्य अत्रे यांनी केलं आहे.

आचार्य अत्रे यांनी 1957 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला. यामध्ये त्यांनी काँग्रेसचे सर्व उमेदवारांना पराभूत केले. पश्चिम महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण निवडून आले. त्यानंतर भाषावार प्रांतरचना करून स्वतंत्र महाराष्ट्र दिला पाहिजे याची जाणीव केंद्राला झाली.

महाराष्ट्राचे नाव मुंबई ठेवण्याला आचार्य अत्रेंचा विरोध

संयुक्त महाराष्ट्राच्या श्रेयाचे वाटेकरी यशवंतराव चव्हाण असतील किंवा मंगल कलश. मात्र, प्रत्यक्षात या लढयासाठी पेठून उठलेली मराठी जनता आणि मराठी घणाघाती लेखामुळे रस्त्यावर उतरायला लावणारी आचार्य अत्रे यांची धमक याखेरीज महाराष्ट्राची निर्मिती झालीच नसती. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे नाव मुंबई असेच ठेवायचे असाही डाव रचण्यात आला होता. या नावाला यशवंतराव चव्हाण यांची संमती होती असं देखील म्हटलं जातं होतं. मात्र, काहीही झालं तरी राज्याचं नाव महाराष्ट्रच असलं पाहिजे हे आचार्य अत्रे यांनी आग्रहाने मांडलं. त्यासोबतच त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून जनतेसमोर हा डाव उघडकीस आणला. यामध्ये त्यांनी ‘याद राखा, महाराष्ट्राचे नाव बदलाल तर’ या आपल्या अग्रलेखात दणदणीत शीर्षकापासूनच त्यांनी सरकारला इशारा दिला होता.

आचार्य अत्रे यांच्या हट्टामुळे राज्याला महाराष्ट्र हे नाव

अत्रेंच्या या अग्रलेखानंतर संपूर्ण राज्यभरात वादळ उठलं. शांत झालेली संयुक्त चळवळ पुन्हा उभी राहते की काय अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली होती. त्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे घेतले. त्यांनी स्वतंत्र राज्याचा विधेयक प्रस्ताव मांडला. त्यात मुंबई राज्य असे राज्याचे नाव ठेवून कंसात (महाराष्ट्र) शब्द टाकला. मात्र, यावर आचार्य अत्रे शांत बसले नाहीत. त्यांनी पुन्हा दैनिक मराठामधून मुख्यमंत्र्यांची खरडपट्टी काढली. त्यानंतर वाद चिघळू लागला. मार्च 1960 मध्ये मुख्यमंत्र्‍यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. यामध्ये राज्याच्या नावावर चर्चा झाली. अनेकांनी आपली मते मांडली. त्यानंतर सर्वांची मते लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र’ हेच नाव ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राज्यपुर्नरचनेचा कायदा मंजूर करून त्यात महाराष्ट्र हेच नाव देण्यात आलं. त्यावेळी कायदा मंत्री शांतीलाल शाह यांनी ही सुधारणा सुचवली होती. आचार्य अत्रे यांच्या हटामुळेच गेली अनेक वर्षे चालत आलेलं महाराष्ट्र हेच नाव राज्याला कायम ठेवण्यात आलं.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!