मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात यावा
मराठवाडा जनविकास संघाची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्ष समितीचे राज्य शासन सदस्य नितीन चिलवंत, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, प्रकाश इंगोले, गया फांऊडेशनचे अध्यक्ष डी. एस. राठोड, मराठवाडा उद्योग संघटनेचे पदाधिकारी शंकर तांबे, मराठवाडा जनविकास सोशल मिडीया प्रमुख अमोल लोंढे आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र विधानभवन व मंत्रालयात दरवर्षी साजरा करण्यात यावा, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाही निवेदन देण्यात आले. अरुण पवार यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड शहारात तीन ते साडेतीन लाख मराठवाडा बांधव नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महापालिका व राज्य शासनाच्यावतीने साजरा करण्यात यावा. याचा शासकीय स्तरावर सकारात्मक विचार होईल, ही अपेक्षा आहे. अरुण पवार पुढे म्हणाले, की भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतात सहाशे ते सव्वासहाशे संस्थानिक होते. त्यानंतर जवळजवळ सर्वच संस्थानिक स्वतंत्र भारतात विलीन झाले. पण निजामाचा स्वतंत्र भारतात विलीन होण्याला नकार होता. मराठवाडा हा 16 जिल्ह्यांचा मोठा प्रदेश होता. जर मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालाच नसता, तर मध्य भारताच्या पोटात पुन्हा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा एक भारतासाठी मोठा धोका होता. म्हणून मराठवाड्यातील लोकांनी लढे उभारले, संघर्ष केला, बलिदान दिले. हा इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे.
नितीन चिलवंत म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे अशा अनेकांनी मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे. निजामाच्या तावडीतून हा प्रदेश मुक्त झाला पाहिजे, यासाठी लढा उभारला. त्यांच्यामुळेच मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन होऊ शकला.