महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ ऑक्टोबर) : रविवारी (दि.१५ ऑक्टोबर) ब्रह्म मुहूर्तावर घटस्थापना करून भाविकांच्या उपस्थितीत नवी सांगवीतील महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. हा सर्वात पवित्र सणांपैकी एक मानला जातो. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.
घटस्थापने पासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्री उत्सवाचा जागर सर्वत्र सुरू असल्याने मांगल्याचे वातावरण पहायला मिळते. या नवरात्री निमित्ताने विविध ठिकाणी आदिशक्तीच्या मंदिरात ही उत्सवाला सुरुवात झाली आहे, औधोगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडच्या सौदर्यात भर घालणाऱ्या नवी सांगवीतील महालक्ष्मी मंदिराचे शिल्पसौंदर्य काही अप्रतिमच आहे . मंदिराच्या गाभाऱ्याची रचना अगदी सुरेख आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आहे, वरच्या एका हातात गदा आहे , एका हातात ढाल आहे . खालच्या उजव्या हातात मातुलिंग , तर डाव्या हातात पानपात्र आहे .
देवीच्या मुकुटावर शिवलिंग आहे . त्यावर नागफणा आहे . देवीचे वाहन सिंह आहे . कपाळी हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आहे . नाकात नथ आहे. अंगावर भरजरी पैठणी आहे . देवीचे हे वैभवशाली रूप आदिशक्ती सगुण साकाराचे दर्शन घडविते. त्यामुळे साक्षात कोल्हापूर ला येऊन ‘अंबा’ मातेचे दर्शन घेतल्याचे समाधान लाभते, असे येथे येणारे भाविक सांगतात.
शुभायास्तु महालक्ष्मीर्भवतां भवतारिणी । बिभ्रती शिरसा लिंगमशेषा घौघहारिणी !!
“ महालक्ष्मीची नित्योपासना पहाटे पाच वाजता सुरू होते . रात्री अकरा वाजता शेजारती होते. देवीच्या चरणांवर दुग्धाभिषेक केला जातो आणि नित्योपासना सुरू होते . दुग्धाभिषेकानंतर गंध , पुष्प व वस्त्रादी उपचारांनी देवीची पूजा केली जाते . काकडा आणि कापूर लावून देवीला ओवाळले जाते , ही आरती सकाळी ७ .३० वा. आणि सायंकाळी ७ .०० वाजता केली जाते. दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवला जातो ,रात्री निद्रा आरतीच्या अगोदर लोणी आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर निद्राआरती करून देवीला झोपविले जाते.