महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ६ सप्टेंबर २०२३- गणेश मंडळांना लागणारा परवाना विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी होणार उपलब्ध होईल तसेच या वर्षापासून मोरया पुरस्काराने गणेश मंडळांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे तसेच पोलीस प्रशासन, वीज वितरण तसेच महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक आज ग दि माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
शहरातील सर्व गणेश मंडळांनी स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांची यादी पोलीस प्रशासनास जमा करावी. पोलीस प्रशासनाकडून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात ओळखपत्र देण्यात येईल तसेच या स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजनही करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले.
या बैठकीस पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, प्रभारी शहर अभियंता ज्ञानदेव झुंजारे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, उपायुक्त मिनिनाथ दंडवते, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, उमेश ढाकणे, शितल वाकडे, सीताराम भवरे यांसह शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना लागणारा परवाना हा विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ही सुविधा सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे.गणेश मंडळांना परवानगी देताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही मात्र पोलीस प्रशासन, महापालिका तसेच इतर यंत्रणांनी निश्चित केलेल्या अटी शर्तींचे पालन करणे संबंधित मंडळांना बंधनकारक असणार आहे. पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आहे. या शहराचे एक वैशिष्ट्य आहे की, येथील सर्व नागरिक एकत्रित सण साजरे करतात आणि हा एकोपा आपल्याला कायम ठेवायचा आहे. गणेश मंडळांनी साऊंड सिस्टीम लावताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतरांचा विचार करावा. साऊंड सिस्टीमच्या आवाजाने कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, असे निर्देशही पोलीस आयुक्त चौबे यांनी यावेळी दिले.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, शहरातील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकींचे मार्ग तसेच सार्वजनिक विसर्जन घाट सुव्यवस्थित करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच त्या ठिकाणी महावितरणाच्या वतीने विद्युत व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक वातावरणात पार पडावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमींची बैठकही घेण्यात आली आहे. गणेश मंडळांनीही यासाठी सहकार्य करणे गरजेचे असून झाडांवर खिळे ठोकणे, पोस्टर लावणे, फांद्या तोडणे हे शक्यतो टाळावे, अशा सूचना जांभळे पाटील यांनी दिल्या तसेच महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने विसर्जन घाटांची पाहणी करून निश्चित करण्यात येणार असून विसर्जन घाटांची यादी नागरिकांसाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गणेश मंडळांच्या सर्व सुचनांची नोंद घेतली आहे. गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पडावा यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यांची डागडुजी तसेच कृत्रिम तलावांच्या आणि विसर्जन घाटांच्या साफसफाईबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळे तसेच नागरिकांनीही काही सूचनांचे पालन केले पाहिजे. निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कलशमध्येच टाकावे, गणेशमुर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदातच करावे आणि पीओपी ऐवजी शाडू मातीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करावी जेणेकरून शहरातील नदीपात्रे स्वच्छ राहतील आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले.वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर म्हणाले, कोणताही अपघात होऊ नये यासाठी शहरातील विसर्जन घाट मार्गांवरील वीजेच्या तारांची उंची वाढवून घेण्यात येत असून तार सर्वेक्षण सुरू आहे. गणेश मंडळांना वापरण्यासाठी वीजेची सोय करण्यात येणार आहे आणि घरगुती दरानेच त्यांना वीज पुरविण्यात येणार आहे. तरी वीजेचा वापर करताना कोणताही अपघात होणार नाही याची काळजी सर्व गणेश मंडळांनी घ्यावी तसेच मंडळांना कोणतीही माहिती हवी असल्यास ग्राहक सुविधा केंद्रात किंवा शाखा केंद्रात भेट देऊन वीज दराबाबतचे अवतरण पाहू शकता.
यावेळी बैठकीस उपस्थित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच गणेश मंडळांनी आपल्या सूचना पोलीस आयुक्त तसेच महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मानले.