महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ ऑक्टोबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर तात्काळ कारवाई करा. यासाठी गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्या. शहरात अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास ते तात्काळ हटवावेत, असे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. सर्व प्रभाग स्तरावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र पथक नेमावे आणि त्या माध्यमातून कारवाई करण्याची मोहीम सातत्याने राबवावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या आहेत.
महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची विविध कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. आयुक्त हर्डीकर हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नगर सचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, मनोज सेठिया, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, सीताराम बहुरे, प्रदीप खोत, निलेश भदाणे, पंकज पाटील, सहाय्यक आयुक्त राजू घुले, उमेश ढाकणे, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, अजिंक्य येळे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह निवडणूक कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक कामकाज प्रशिक्षण, मतदान केंद्र, ईव्हीएम व्यवस्थापन, वाहन अधिग्रहण, जनसंपर्क व प्रसिद्धी, स्विप व्यवस्थापन, निवडणूक खर्च व्यवस्थापन, न्याय व विधी कक्ष, संगणकीय कामकाज आदी निवडणूक कामकाजासंबंधी सर्व बाबींचा आयुक्त हर्डीकर यांनी आढावा घेऊन आवश्यक तरतूद ठेवण्याच्या सूचना दिल्या.
तसेच मतदार प्रक्रियेच्या अनुषंगाने तात्काळ करावयाच्या उपाययोजना व कार्यवाही याबाबत संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून सोपवलेली जबाबदारी विहित वेळेत चोखपणे पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
…..















