महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२४ सप्टेंबर : गेल्या एक महिन्यात सांगवी पिंपळे गुरवमध्ये झाडे उन्मळून पडण्याचे सत्र काही थांबता थांबेना. महापालिकेचे उद्यान विभाग याकडे डोळे झाक तर करीत नाही ना? असा सवाल येथील परिसरातील नागरिक करीत आहेत.
नवी सांगवी मधील क्रांती चौकातील बोरा हॉस्पिटल रोडवर दिवसभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक येथील रस्त्याच्या कडेला असलेले एक कुजलेले झाड अर्ध्यावरूनच तुटून पडल्याची घटना घडून आली. यावेळी रस्त्याने एक डंपर जात होता. त्या डंपरवर हे झाड पडल्याने पुढील होणारा अनर्थ टळला अन्यथा मोठे नुकसान झाले असते. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
यावेळी येथील स्थानिक नागरिक अशोक कवडे, दिनेश कोकणे यांच्या झाड पडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्वरित रहाटणी येथील अग्नीशमन दलाला याबाबत संपर्क करून माहिती दिली. काही वेळातच घटनास्थळी अग्नीशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जवानांनी तत्परता दाखवत झाडाच्या फांद्या छाटून काही वेळातच रस्ता सुरळीत करून दिला. जवानांनी झाडाच्या फांद्यांचा ढिगारा एका बाजूला रचून रस्ता मोकळा केला.
गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्दशी दिवशी सकाळीच पिंपळे गुरव येथील पेरूच्या बागेच्या रोडवर झाड उन्मळून पडल्याने दुचाकीवरून मागे बसून जाणारी २५ वर्षीय महिलेच्या डोक्यावर फांदी पडून जागेवरच बेशुद्ध पडली. उपचारानंतर ती एका खाजगी हॉस्पिटल मध्ये अजूनही कोमात असल्याची माहिती मिळाली.
दोन आठवड्यांपूर्वी पिंपळे गुरव येथील रामनगरमध्ये झाड उन्मळून पडल्याने दोन चार चाकी मोटर वाहनांचे मोठे नुकसान झाले. यावेळी देखील अग्नीशमन विभागाने तत्परता दाखवत रस्ता सुरळीत करून दिला. अशा पद्धतीने येथील परिसरात झाडे पडण्याचे सत्र काही थांबता थांबेना यामुळे येथील नागरिक महापालिकेच्या उद्यान विभागावर नाराजी व्यक्त करीत आहेत. उद्यान विभागाचे अधिकारी याचे गांभीर्यच लक्षात घेत नसून याकडे ते डोळे झाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.