Google Ad
Editor Choice

गणेशोत्सव आदर्श आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून या आहेत, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सुचना

 महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ जुलै २०२२) :- सन २०२२ चा गणेशोत्सव आदर्श आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

या मार्गदर्शक सुचनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश :

Google Ad

 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या  धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. नागरिकांनी गणेश उत्सवासाठी शाडूमातीच्या, तुरटीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक (विघटनशील) मूर्तीना प्राधान्य द्यावे किंवा धातु, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या पुनर्वापर करता येणाऱ्या मूर्ती वापराव्यात. मूर्तीसाठी विषारी व अविघटनशील रासायनिक रंग वापरण्यास सक्त मनाई आहे.  मुर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्याने त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. गर्दी टाळण्यासाठी विसर्जनासाठी यावर्षी कृत्रिम विसर्जन हौद उपलब्ध करुन देण्यात येतील. नागरिकांनी  घरीच किंवा परिसरात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, जेणेकरुन आगमन आणि विसर्जनासाठी गर्दी टाळणे शक्य होईल. उत्सवाकरिता वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यासच मंडळाने त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मंडळांनी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबीरे रक्तदान शिबीर इत्यादी आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी श्रीगणेशाचे आरती व दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या च्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढताना संपूर्ण चाळीतील किंवा इमारतीतील सर्व घरगूती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची सोय त्याच परिसरात करावी.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने एक भाग किंवा वॉर्ड एकच गणपती ही संकल्पना राबविणे बाबत पुढाकार घ्यावा व शक्यतो लहान आकाराची पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करावी व त्याच ठिकाणी विसर्जनाची सोय करावी. शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरीस [POP] च्या मूर्ती वापरु नये. अशा मूर्ती तयार करणाऱ्यांनी मूर्तीच्या खाली सदरची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसची, असल्याबाबत लाल मार्किंग करावी. जेणेकरून सामान्य नागरिकांना मूर्ती ओळखणे सुलभ होईल. घरगूती मूर्त्यांची आरास करण्यासाठी तसेच देखाव्यासाठी प्लॅस्टिक, थर्माकोल व इतर पर्यावरणास हानीकारक वस्तूंचा वापर करु नये व नैसर्गिक अशा विविधरंगी फुलांच्या आरासीन अधिकाधिक प्राधान्य द्यावे. विद्युत रोषणाईचा व ध्वनिक्षेपकाचा वापर कायदेशीर मर्यादेत करणेत मानांकाप्रमाणे दिवसा व रात्री ध्वनीची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी. निर्माल्य व पूजा साहित्य नदीपात्रात अथवा तलावात न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे. विसर्जनाच्या ठिकाणी कचरा, उरलेले सजावटीचे व पूजेचे साहित्य तसेच इतर साहित्य जाळण्यास सक्त मनाई आहे.

संपूर्ण गणेशोत्सवात शांतता राखणेकामी व महोत्सब सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका कर्मचारी, होमगार्ड, आरोग्यसेवक, पोलिस यांना सहकार्य करावे. सर्व प्रकारच्या प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापरावर महाराष्ट्र शासनाचे अधिनियमानुसार बंदी करणेत आलेली आहे त्यामुळे उत्सवाच्या काळात तसेच विसर्जनाच्या वेळी नदी पात्रात / तलावात / निर्माल्य कलशात प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करु नये. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केलेला आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.  सार्वजनिक ठिकाणी असलेला ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे साठवून त्याची स्थानिक आरोग्य विभागाच्या मदतीने योग्य ती विल्हेवाट लावावी.  नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या परिसरामध्ये मंडळांनी शक्यतो मूर्तीदानाचे कार्यक्रम राबवावेत राज्य सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचा स्त्रोत दूषित करणे हा दंडनिय अपराध आहे त्यामुळे नदीचे पाणी दूषित न होणेकामी सर्व नागरिकांनी व गणेश भक्तांनी सहकार्य करावे. कोविड १९ या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती आणि  सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव  साजरा करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने  करण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!