महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या वतीने चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा (३७५) निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यात सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा पार पडली, त्याच बरोबर पहाटे काकड आरती, सकाळी संगीत गाथा पारायण, सायंकाळी हरिपठाचेही आयोजन करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याची सांगता श्री.उल्हास महाराज सुर्यवंशी (बाबा) (अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षणसंस्था यांच्या काल्याच्या किर्तनाने शुक्रवारी झाली.
यावेळी शांतीब्रम्ह गुरुवर्य समन्वयमहर्षि ह.भ.प.श्री. मारोती महाराज कु-हेकर (बाबा) यांच्या शुभहस्ते विजय पांडुरंग जगताप (वारकरी भूषण) यांना सद्गुरु जोग महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना ह.भ.प.श्री. पंकज (चेतनानंद) महाराज गावडे म्हणाले,” विजय पांडुरंग जगताप हे संत सेवकांना जपणारे त्यांची काळजी घेणारे असून त्यांचे या संप्रदायाकरीता फार मोठे योगदान आहे, त्यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर होणाऱ्या भव्य अशा मंदिरास भरीव निधी मिळवून देण्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे आणि आजही ते करत आहेत, गाईंच्या करिता चारा असो किंवा कुठे मोठे अन्नदान असो विजूभाऊ मोठ्या मनाने हे कार्य करत असतात, अयोध्या राम मंदिराचे स्वामी गोविंद गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खूप मोठे हिंदू धर्म जागृतीचे धर्मकार्य हाती घेतले आहे, त्यांच्या या कार्याला प्रेरित होऊनच सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.”
या सोहळ्यास भाषाप्रभु परमपुज्य डॉ. ह.भ.प.श्री. पंकज (चेतनानंद) महाराज गावडे, ह.भ.प.श्री. विजयआण्णा जगताप (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वा.म.पिं.चिं.शहर, विलासतात्या जगताप, शेखर (आण्णा) चिंचवडे (उपाध्यक्ष भाजपा. पिं.चि. शहर), नाना शिवले, सचिन चिंचवडे (मा. महापौर पिं.चिं. मनपा), ह.भ.प.श्री. विजय (बापू) भोंडवे अध्यक्ष अ.भा.वा.मं. पिं.चिं. शहर, गोरोबा (काका) कोल्हे (मा. पोलिस अधिकारी), उध्दव महाराज कोळपकर, महाविर महाराज सूर्यवंशी, रामलिंग महाराज मोहिते, अर्जुन महाराज फलके, दत्ताभाऊ चिंचवडे (अध्यक्ष श्री भोलेश्वर प्रतिष्ठाण व ज्ञानेश्वरी सेवासमिती), ह.भ.प.श्री.माऊली महाराज आढाव, सतिश महाराज भुजाडे, अमोल काळुराम भोंडवे, बाबासाहेब बागल, बाळासाहेब अंकुश चिंचवडे (रजनीगंधा हौ. सो. अध्यक्ष),निलेशशेठ आहेर (अध्यक्ष चिंतामणी मित्रमंडळ), गणेश गावडे,निलेश सोपान भोंडवे तसेच परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
ज्यांनी सार्या जगाला आपलं म्हणावं,
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । अापण जाहला ।।
हे विश्व माझे आहे व या विश्वातल्या घरातला प्रत्येक सदस्य माझा आहे…
केवढं मोठं ह्रदय म्हणता येईल माऊलींचे..
असो ह्याच पुण्यपावन अशा अलंकापुर नगरीमध्ये माऊलीच्या समाधीबरोबरच आधुनिक काळात प्रकर्षाने जाणवणारं एक सांप्रदायिक वैशिष्ट्य म्हणजे नुकतीच २०१७ साली शताब्दी पुर्ती झालेली स्वा.सु.सद्गुरु जोग म संस्थापित वारकरी शिक्षण संस्था. हि संस्था गेली १०० वर्षे ज्ञानदानाचं व नैतिक शिक्षणाचं अखंडपणे कार्य करत आहे…
स्वा.सु.सद्गुरु जोग महाराजांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच (गुढीपाडवा ) नवीन वर्षाच्या पर्वावर सन १९१७ साली हि वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली.
महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी शिक्षणसंस्था आहेत. विष्णुबुवा जोग यांनी आळंदी येथे स्थापन केलेली संस्था ही पहिली वारकरी शिक्षण संस्था. ही संस्था त्यांनी इ.स. १९१७ साली स्थापन केली. संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारूतीबुवा गुरव यांच्या प्रयत्नाने झाली. ती आज वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाते.या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करवून घेतला जातो आणि कीर्तन-प्रवचन-हरिकथा आदींचे प्रशिक्षण दिले जाते.