महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे नाबा यांच्यावर हा हल्ला झाला आहे.आज दुपारी एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असता ते कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. जखमी अवस्थेतच नाबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसाढवळ्या प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आरोग्यमंत्री नाबा दास हे झारसुगुडा येथील आमदार आहेत. आज दुपारी 12 वाजता ते मतदारसंघातील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी ब्रजराजनगरातील गांधी चौकात त्यांच्या छातीवर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.
एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या घातल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, गोळीबार का केला याची माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर नाबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना एअरलिफ्टने भुवनेश्वरला नेण्यात येत आहे. या घटनेनंतर बीजेडी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला आहे.
नाबा यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट होता असं सांगितलं जातं. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. नाबा दास यांना केवळ पोलीस सुरक्षा देण्यात आली होती.
नाबा यांच्यावर ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची ओळख पटली आहे. गोपाल दास असं या हल्लेखोराचं नाव आहे. गोपाल दास हा गांधी चौकात एएसआय म्हणून तैनात होता. गोपाल दासने नाबा यांच्यावर 4 ते 5 राऊंड गोळीबार केल्याचं सांगितलं जातं. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
नाबा दास हे बीजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते आहेत. मागे ते महाराष्ट्रात आले होते. त्यांनी शनि शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयाहून अधिक किंमतीचे सोन्याचे कलश दान केले होते. त्यांनी शनि शिंगणापूर मंदिराला 1.7 किलो ग्रॅम सोने आणि 5 किलो चांदीचा कलश दान दिला होता.