जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं
पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ९ सप्टेंबर २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा नुकतीच एच. ए. स्कूल पिंपरी येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुजाता कोरके, आशा माने तसेच क्रीडाधिकारी रंगराव कारंडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा समन्वयक कन्हेरे यांनी केले, तर क्रीडाशिक्षक मुकेश पवार, हनुमंत सुतार व शिवाजी मुटकुळे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले. पंच म्हणून पिंपरी चिंचवड डॉजबॉल संघटना व पुणे जिल्हा डॉजबॉल संघटनेचे सचिव रामेश्वर हराळे व त्यांच्या टीमने काम पाहिले. स्पर्धेत खेळाडूंनी दमदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
१७ वर्षे मुलगे गटात एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण १०) यांनी शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम, निगडी (गुण ४) यांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय स्थानावर सावित्रीबाई फुले शाळा, मोशी (गुण ५) तर चौथ्या स्थानावर एम. एम. विद्यामंदिर, काळेवाडी (गुण ३) राहिले.
१७ वर्षे मुली गटात एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण १६) यांनी विद्यानंद भवन स्कूल, निगडी (गुण ०) यांचा पराभव करून विजेतेपद मिळवले. तृतीय स्थान सेंट पीटर स्कूल (गुण ५) यांनी मिळवले तर पीसीएमसी पिंपळे गुरव विद्यालय (गुण २) चौथ्या स्थानावर राहिले.
१९ वर्षे मुली गटात शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम, निगडी (गुण ६) यांनी एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण २) यांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय स्थान एम. एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळेवाडी (गुण ९) यांनी मिळवले तर सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी (गुण १) चौथ्या स्थानावर राहिले.
या स्पर्धेत एच. ए. स्कूल, पिंपरीने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण दोन विजेतेपद पटकावून आपला डंका वाजवला. स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


