Google Ad
Uncategorized

गुलकंद’मध्येही हास्यजत्रेच्या विनोदांची स्वच्छता अन् शुध्दता …. नाच-गाणी, धमाल किस्से, हास्य फटाक्यांनी रंगल्या दिग्गजांच्या गप्पा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ एप्रिल) : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला मनस्वी आनंद तर दिलाच, उत्तम आरोग्यही दिले. संपूर्ण जगाची उलथापालथ झाली, तेव्हा प्रत्येकजण दु:खाच्या खाईत लोटला गेला होता. अशा संकटकाळात हास्यजत्रेने आधार दिला. स्वच्छ आणि शुध्द विनोद हे हास्यजत्रेचे वैशिष्ट्य आहे. अगदी तीच विनोदातील स्वच्छता आणि शुध्दता गुलकंदमध्येही आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते प्रसाद ओक यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने “निमित्त गुलकंदचे, दिलखुलास गप्पा हास्यजत्रा टीमसोबत” या कार्यक्रमाचे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. ओक यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेते समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, शार्विल आगटे, गायिका सावनी रवींद्र व्यासपीठावर उपस्थित होते. मुलाखतकार व लेखक सचिन मोटे यांनी नेमके प्रश्न विचारत या सर्वांना बोलते केले. सर्वांनी दिलखुलास उत्तरे दिली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तुडुंब भरलेल्या सभागृहात हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

Google Ad

गोस्वामी आणि मोटे यांनी गुलकंदच्या निर्मितीचे विविध टप्पे उलगडून सांगितले. समीर चौघुले, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, ईशा डे यांनी चित्रीकरणादरम्यान आलेले गमतीदार किस्से सांगितले. एकमेकांची फिरकी घेत कलाकारांनी केलेल्या हास्यविनोदांच्या पेरणीचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. सावनी रवींद्र यांनी कलाकारांसह गुलकंदचे शीर्षक गीत गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. टीम गुलकंदने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले, तेव्हा ‘आमच्यात कोणीच नाही मंद, एक मे पासून सर्वांनी पहा गुलकंद’ या शार्विलने केलेल्या शाब्दिक कोटीने सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते ओक आणि चौघुले यांचा तर चंद्ररंगचे संचालक आणि उद्योजक विजय पांडुरंग जगताप यांच्या हस्ते मोटे आणि गोस्वामी यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर मंगला कदम व अपर्णा डोके यांच्या हस्ते सई आणि ईशा यांना सन्मानित करण्यात आले. याखेरीज, टपाल खात्यातून सेवानिवृत्त झालेले दिशाचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान, काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना या वेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमात राहूल कलाटे, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, अमित गावडे, समीर मासूळकर, राजेंद्र साळुंके, बळीराम जाधव, संतोष कांबळे, राजू गोलांडे, राजू बनसोडे, कांतीलाल गुजर, नितीन धुंदुके आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. प्रास्तविक नाना शिवले यांनी केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सई ताम्हणकर यांनी आभार मानले. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह सर्व दिशा सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

कलाकारांच्या प्रतिक्रिया :
गेली २९ वर्षे मी काम करतो आहे. नाटकांचे सर्व मिळून पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. त्यात यदा कदाचित नाटकाचे प्रयोग सर्वाधिक आहेत. आतापर्यंत १६ चित्रपटांमध्ये काम केले. अलिकडे काही वर्षे लेखनाचे कामही करतो आहे. पाच वर्षे कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले. त्यानंतर गेली सात वर्षे महाराष्ट्राची हास्यजत्रा करतो आहे. जवळजवळ १२ वर्षे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्यासोबत मी काम करतो आहे. नायक म्हणून गुलकंद हा माझा पहिलाच सिनेमा आहे. खरं पाहता नायकासाठी मला निवडणं हे त्यांचे एकप्रकारचे धाडसच मानले पाहिजे. गुलकंद सिनेमाचा अनुभव समृध्द करणारा होता.
– समीर चौघुले

कोणत्याही कलाकाराने ठराविक साच्यात अडकून राहू नये. त्याने सतत प्रयोगशील असावे. आयुष्य आनंदी, सुखी होण्यासाठी मस्तीखोर असले पाहिजे. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कामावर श्रद्धा असली पाहिजे. दिग्दर्शकाचे व्हीजन असते, त्याचा आदर राखलाच पाहिजे. हास्यजत्रेमुळे मी माणूस म्हणून कशी आहे, ते प्रेक्षकांना समजून आले, याचे मला खूप समाधान आहे.
– सई ताम्हणकर

सुरूवातीपासूनच नाटक, मालिका, सिनेमे करताना आव्हानात्मक भूमिका करण्यास प्राधान्य दिले. वेगवेगळे प्रयोग करण्याची भीती कधीच वाटली नाही. माझ्यावर आर्थिक जबाबदाऱ्या होत्या, पैशांची नितांत गरज होती. त्यामुळे येईल ते काम स्वीकारत गेलो. माझे मित्र तथा गुरु मोहन जोशी यांनी मला मौल्यवान असा कानमंत्र दिला. त्यानुसार, मी कोणत्याही कामाला नाही म्हणालो नाही. कधी कोणत्या कामामुळे भाग्य उजळून निघेल, हे सांगता येत नाही. मी ज्यांच्याबरोबर काम केले, त्या प्रत्येक निर्मात्याने तथा दिग्दर्शकांनी मला पुन्हा पुन्हा संधी दिली. या न्यायाने मी सर्वाधिक यशस्वी अभिनेता असल्याचे मानतो. मला कोणत्याही प्रकारचा शिक्का नको असतो. ‘ती रात्र’ नावाचा सिनेमा होता, त्यासाठी मला राज्य पारितोषिक मिळाले. ‘कच्चा लिंबू’च्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाले. मला उशिरा यश मिळते. मात्र ते यश घवघवीत असते. थांबायची माझी तयारी असते. रोल छोटा किंवा मोठा याचा विचार मी करत नाही, माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे महत्व काय आहे, हे माझ्यादृष्टीने अधिक महत्वाचे असते. इंडस्ट्रीत टिकायचे असेल तर चांगले काम केलेच पाहिजे. चांगली कामगिरी करून दाखवली तरच लोकांना आवडणार आहे. लोकांना आवडत राहण्यासाठी जे समोर येईल, ते चांगल्याप्रकारे करणे हे माझ्यासारख्या कलाकाराचे कर्तव्य आहे.
– प्रसाद ओक

नाटकांच्या तुलनेत सिनेमा करणे खूप आव्हानात्मक आहे. सिनेमाची प्रक्रिया अस्वस्थ करणारी असते. सिनेमा तयार झाल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे खूप कठीण गोष्ट असते. तथापि, ‘एव्हरेस्ट’चे संजय छाब्रिया यांच्यामुळे आम्हाला खूपच मदत झाली. छाब्रिया म्हणजे सिनेमावर जीव टाकणारा माणूस आहे. त्यांच्यामुळे गुलकंदचे खूप चांगले प्रमोशन झाले. छाब्रिया यांचा अनुभव मोठा असून त्यांच्याकडे खूप चांगली टीमही आहे. गुलकंदच्या निमित्ताने त्यांच्यासोबत सुखद प्रवासाचा अनुभव घेता आला. एव्हरेस्टच्या भक्कम पाठबळामुळे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यात यश आले, त्याचे श्रेय छाब्रिया यांचे आहे.
– सचिन गोस्वामी

बऱ्याच वर्षांनी मराठीत चांगले फॅमिली साँग आले आहे. पुन्हा एकदा रेट्रो काळात घेऊन जाणारे प्रेमाचा गुलकंद…हे गाणे रिलीज झाल्यानंतर खूप चांगल्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून प्राप्त झाल्या. त्यानुसार हे गाणे ऐकताना, पाहताना खूप आनंद वाटतो, असाच सूर आहे.
– सावनी रवींद्र

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!