महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मार्च) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एक समिती नेमण्यात आली असून सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे आम्ही हा संप मागे घेत असल्याचं सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात देखील माहिती दिली.
शिंदे म्हणाले, ”सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर आज बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या आधी १३ तारखेला देखील मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे सचिव आम्ही बैठक घेतली होती. यानंतर आजही पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही प्रतिसाद दिला”.
त्यानंतर संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी उभं राहील. स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त करून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल”, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिलं.