महाराष्ट्र 14 न्यूज, १२ जुलै २०२३:- डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध भागांची तपासणी करून नोटीस बजावण्याची कारवाई महापालिकेने तीव्र केली असून औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामाच्या साईटवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या भागांची तपासणी करून संबंधितांना नोटीसा बजावण्यात येत आहेत शिवाय अशी ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.
डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात अपयशी ठरल्याबद्दल ड, ई आणि फ प्रभागातील बांधकाम सुरू असलेल्या ५ ठिकाणांना दंड ठोठावण्यात आला आहे. कीटकजन्य रोगाचा उद्रेक होऊ नये यासाठी महापालिकेने आठ प्रभागांमध्ये तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकांमध्ये मनुष्यबळाची संख्यादेखील वाढवली आहे. जून आणि जुलै महिन्यात ५४८ बांधकाम साइट्ससह एक लाखाहून अधिक निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी पुर्ण केली आहे. शिवाय या आस्थापनांची वारंवार तपासणीदेखील केली जात आहे. त्यापैकी कायमस्वरूपी डास उत्पत्तीची २८८ ठिकाणे आणि ५३९ तात्पुरती ठिकाणे आढळून आली.
आरोग्य विभागाने या वर्षी जून आणि जुलै महिन्यात कायमस्वरूपी व तात्पुरती प्रजनन स्थळे नष्ट केली असून शहराच्या हद्दीतील २८७ निवासी व व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. या दोन महिन्यांत डास उत्पत्तीची ठिकाणे साफ करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आजअखेर महापालिकेने ८ आस्थापनांना ५७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असून डासांची उत्पत्ती होणारी स्थळे प्राधान्याने नष्ट करणे महत्वाचे आहे. यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली असून विशेष पथकांचीदेखील प्रभागनिहाय नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामार्फत नियमितपणे तपासणी आणि कारवाई करण्यात येत आहे. पथकांमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. कीटकजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी बांधकामाधीन ठिकाणांसह निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांनी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी.
आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केली असून याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. प्रभाग स्तरावर विविध भागात पथकामार्फत राबविण्यात येणारी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या तपासणी पथकातील कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. डास उत्पत्तीचे ठिकाण आढळून आल्यास ते तात्काळ नष्ट केले पाहिजे, यासाठी नागरिकांनीदेखील या मोहीमेत सहभागी व्हावे.
PALAASH INSTITUTE PRESENTS FREE AYURVEDIC COSMETIC WORKSHOP ON 16TH JULY SUNDAY
वैद्यकीय विभागाने तपासणी केलेल्या रुग्णांच्या यावर्षीच्या अहवालात दि. ११ जुलैपर्यंत डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले होते. या अहवालानुसार जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत सुमारे १ हजार १४ संशयितांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळून आली आहेत. घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते. त्यामुळे या ठिकाणांची नागरिकांनी नियमितपणे तपासणी केली पाहिजे. महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच दवाखान्यांमध्ये डेंगूच्या तपासणीकरिता आवश्यक असलेले रॅपिड किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. किटकजन्य रोग नियंञणासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरिकांच्या घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले जात आहे. पावसाळ्यात महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरू नयेत म्हणून महापालिकेने खबरदारी घेतली आहे. या मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…