महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग १ व वर्ग ४ मधील सर्व गणवेश देय कर्मचा-यांना दरवर्षी गणवेश तसेच पावसाळी व हिवाळी साधने पुरवण्यात येतात. याबाबत वेळोवेळी निविदा प्रसिद्ध केल्या जायच्या परंतु कायमच दिरंगाई होत असे. तसेच कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणा-या साधनांचा दर्जा सुमार असायचा. यामध्ये होत असलेली कर्मचा-यांची पिळवणुक लक्षात घेवुन यामधुन कर्मचा-यांची कशाप्रकारे सोडवणुक करता येईल या दृष्टीकोनातून यासाठी राज्य शासनाच्या डिसेंबर २०१६ चे परिपत्रका प्रमाणे लाभार्थ्यांना देय रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरणाचा अवलंब करणेत आला.
त्याच धर्तीवर महासंघाच्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या वतीने प्रशासनाकडे याबाबत लेखी मागणी करण्यात आली होती व याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबत दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी मा.आयुक्त राजेश पाटील यांनी कर्मचा-यांना गणवेशा ऐवजी थेट रक्कम कर्मचा-यांच्या बँक खात्यावर जमा करणेचा आदेश पारित केला आहे.

त्यामुळे कर्मचारी गणवेशाबाबत यापुढे कोणतीही दिरंगाई अथवा हस्तक्षेप न होता कायमस्वरुपी गणवेशाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा धोरणात्मक निर्णय करण्यात आला. यापुढे कर्मचा-यांना चांगल्या दर्जाचे गणवेश खरेदी करता येणार आहे. त्याचा त्यांच्या राहणीमानावर तसेच मनपा कामकाजावरही चांगला परिणाम होणार आहे. याबाबत सर्व कर्मचारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असलेचे महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगीतले आहे.
98 Comments