Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसांच्या भव्य पवनाथडी जत्रेचे आयोजन…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १० जानेवारी २०२४ :-* महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर दि ११ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून या जत्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

गुरूवार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. तसेच खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Google Ad

महिला बचत गट आणि वैयक्तिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी माध्यम ठरले आहे. यामध्ये महिला बचत गटांसाठी विक्री प्रदर्शनासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतात. यावर्षी देखील सोडत पद्धतीने स्टॉल्सचे वाटप करण्यात आले आहे. यंदा दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

जत्रेच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध भागातील पारंपरिक लोककलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक लोककलांचे सादरीकरण लोककलाकार याठिकाणी सादर करतील. लहान मुलांना विविध आकर्षक व मनोरंजक खेळ खेळण्याची व अनुभवण्याची संधी जत्रेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना विविध खाद्यसंस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाचीही मेजवानी मिळणार आहे.

पवनाथडी जत्रेमध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ११ जानेवारी रोजी मराठमोळी संस्कृती जतन करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आयोजित करण्यात आला असून १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘म्युझिक मेकर्स’ हा सुमधूर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होईल तर ७.३० वाजता ‘खेळ रंगला पैठणीचा- होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सादर होईल. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता किशोरकुमार, आर. डी. बर्मन आणि बप्पी लहिरी यांच्या गाण्यांचा ‘सुपरहिट्स ऑफ बॉलिवूड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लावणी महोत्सव’ हा लावणी सम्राज्ञींचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच पवनाथडीच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मराठी- हिंदी गीतांचा नजराणा ‘कारवाँ गीतोंका’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने विविध शहरातून तसेच महापालिकांमधून समित्या, अनेक मान्यवर जत्रेस भेट देत असतात. तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, राजकीय नेतेमंडळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील जत्रेत सहभागी होतात. सलग पाच दिवस चालणाऱ्या जत्रेमध्ये सुमारे तीन ते पाच लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या नागरीकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!