महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 ऑक्टोबर :- ‘आपले आरोग्य — आमची जबाबदारी’ या सामाजिक संदेशाने प्रेरित होऊन दक्षिण पुण्यातील धनकवडी या भागात कार्यसिद्धी प्रतिष्ठान चे अध्यक्ष गिरीराज सावंत यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य सेवेच्या महायज्ञात असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला.
दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायं५.०० या वेळेत पुणे महानगरपालिका मैदान, मोहननगर, धनकवडी येथे हे शिबिर पार पडले. दोन दिवस चाललेल्या या महाआरोग्य शिबिरात पुण्यातील नामांकित हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांना विनामूल्य आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच गरजूंना शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात आली.

या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, नेत्र, कान-नाक-घसा, दंत, हाडे व सांधे, स्त्रीरोग, त्वचारोग, बालरोग, 40 वर्ष वयावरील महिलांच्या करीता स्तनांच्या कॅन्सर ची तपासणी तसेच त्यावरील उपचार, जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप आणि सामान्य वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
नागरिकांसाठी रक्तदाब, साखर तपासणी, सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने मोफत करण्यात आल्या, तसेच रुग्णांना चेष्मे वाटप ही करण्यात आले.
गरजू रुग्णांना त्वरित औषधोपचार तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांची व्यवस्था या ठिकाणी विनामूल्य करण्यात आली. अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिरातील सेवा आणि व्यवस्थेबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचवणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबद्दल जनजागृती करणे हा होता. शिबिरात स्वयंसेवक, वैद्यकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
‘कार्यसिद्धी महाआरोग्य शिबीर’ च्या माध्यमातून आरोग्य सेवेबाबत लोकांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन परिसरात अधिक व्यापक प्रमाणात करण्याचा संकल्प आयोजक गिरीराज सावंत यांनी व्यक्त केला आहे.


