महाराष्ट्र 14 न्यूज, १८ जानेवारी २०२४ :- पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, कृष्णराज कॉलनी, अमृता कॉलनी, भाऊनगर, मुक्तांगण लॉन्स, देवकर पार्क, शिवनेरी कॉलनी या भागांतून वारंवार ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो अशी वाहने भरुन राडारोडा नदीकाठी टाकला जात असल्याची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
नदीपात्रात भराव करणारे नितीन दर्शिले यांचे ४ हायवा ट्रक, दामोदर तळमट्टी यांचा ट्रॅक्टर, नागनाथ मंजुळे यांचा एक टेम्पो, लकाप्पा पुजारी यांचा एक टेम्पो, राठोड यांचा एक ट्रॅक्टर अशी आठ वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. तसेच या वाहनमालकांकडून एकुण ७० हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे तसेच मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये पर्यावरण पथकाचा तसेच एमएसएफ व मेस्को जवानांच्या पथकांचाही सहभाग होता.
नदीपात्रात भराव टाकल्यामुळे नदीचे पात्र अरूंद होत असून नदीप्रदूषण होत आहे. त्यामुळे यापुढे नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. पथकांमध्ये सुरक्षारक्षक आणि कामगारांचा समावेश असून नदीमध्ये भराव टाकणाऱ्या जागामालक, गाडी मालक, वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वाहनेही जप्त करण्यात येतील, अशी माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.