पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या-उपमुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे शहरातील विविध विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, वैशाली घोडेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनासारख्या विविध लोकल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्याचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. शहराचा सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरातील विकास कामे करताना नगर विकासाच्या नियमावलीप्रमाणे कामे झाली पाहिजे. कामे करताना त्रुटी कमी करुन ती दर्जेदार करण्यावर भर दिला पाहिजे. केंद्र व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
*उत्तम आरोग्य सेवा देण्यावर भर*
राज्य शासनाने नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेषतः अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करा. येत्या काळात शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचा विचार करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.
*दर्जेदार शिक्षण देण्यावर भर द्या*
विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज इमारत, स्वच्छतागृह, ई-क्लासरुम आदी पायाभूत सुविधा उभारणी भर द्यावा. मनपा प्राथमिक शाळेत ई-क्लासरुम करताना वायफाय, एचडी कॅमेरे, एलईडी डिस्प्ले आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करा. ‘आयटीआय’मध्ये रोजगार निमिर्तीच्या अनुषंगाने अभ्यासक्रम सुरु करा. नवीन शाळेची इमारत करताना त्यामध्ये मराठी माध्यमासोबत गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न करावा.
*प्रदूषणमुक्त आणि झोपडपट्टी मुक्त शहर करण्यावर भर*
प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक धोरणाप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याची कार्यवाही करावी. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यापासून वीज निमिर्ती करण्यावर भर द्या, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या भागात स्मशानभूमी आणि दफनभूमी निर्माण कराव्यात. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. बेघर नागरिकांना पक्के घरे देण्याची कार्यवाही करा, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
*पाण्याचा काटकसरीने वापर करा*
सद्याच्या मान्सूनच्या स्थितीचा विचार करता सर्वत्र पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. शहराला पवना, आंध्र धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळातील परिस्थितीचा विचार करुन पाण्याच्या काटकसरीने वापराचे नियोजन करावे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन करावे. रस्ते दर्जेदार, टिकाऊ पद्धतीने विकसित होतील, याकडे विशेष लक्ष द्या. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावेत, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.
श्री. सिंह यांनी शहरातील विकास कामाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे, वाहतूक नियंत्रण आदी सुविधा मनपामार्फत करण्यावर भर देण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मोशी येथे नवीन रुग्णालय प्रस्तावित आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने महिला बचतगटांसाठी मॉल उभारण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांना घरपोच दाखला देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने उद्याने विकसित करण्यावर भर देण्यात आहे, असेही श्री. सिंह म्हणाले.
बैठकीत पवना, इंद्रायणी व मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पवना बंद पाईपलाईन, भामा आसखेड प्रकल्प, २४ x ७ पाणी पुरवठा योजना, पाण्याची साठवण क्षमता, स्मार्ट शहर प्रकल्प, पुणे-निगडी विस्तारित मेट्रो मार्ग, अंतर्गत रिंगरोड, पुनवळा येथील कचरा डेपो, नाशिक फाटा-चाकण फाटा, आळंदी ते लोहगाव रस्ता, बायोगॅस आणि सौरऊर्जा प्रकल्प, कचरा प्रश्न, अण्णासाहेब मगर क्रीडांगण, कर संकलन, जलशुद्धीकरण प्रकल्प, मैला शुद्धीकरण प्रकल्प, मनपाची नवीन प्रशासकीय इमारत आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला जनतेने अभुतपूर्व…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…