Google Ad
Editor Choice

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरात या विविध कार्यक्रमांचे झाले उद्घाटन, लोकार्पण…

 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३ जून २०२२) : महानगरपालिकेच्या वतीनेराबविण्यात आलेल्या  विविध प्रभागातील प्रकल्पांचा भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते आज संपन्न झाला.

Google Ad

          या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याची सुरुवात सकाळी साडेसात वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उद्योग सुविधा कक्ष  व सीएसआर सेलच्या उद्घाटनाने  झाली.  खाजगी संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजना कल्पना तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासात अधिकाधिक भर घालण्याच्या उद्देशाने सीएसआर सेल सुरु करण्यात आला आहे.  यावेळी प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके आणि महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलिस दल,  तृतीयपंथी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा ऑनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.  या योजनांमध्ये महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड शहरात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मोटार सायकल हे  प्रभावी माध्यम आहे. पोलीस पेट्रोलिंगसाठी  ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आल्या.  या मोटार घेणेकामी ५० लाख ९६ हजार रुपये  इतका खर्च करण्यात आला आहे.  तसेच यावेळी  ग्रीन मार्शल पथकासाठी हेल्ड डिव्हाईसचे वितरण करण्यात आले.  प्रातिनिधिक स्वरुपात हे डिव्हाईस तृतीयपंथीयांनी स्विकारले.

मनपा क्षेत्रातील अरुंद रस्ते, मार्केट परिसर तसेच दाटीवाटीच्या गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्स अत्यंत उपयोगी आहेत.  अशा ६ फायटर मोटार सायकल्सचे वाटप अग्निशमन विभागाला यावेळी करण्यात आले.  या मोटार सायकल्स खरेदीकामी ८० लाख ८८ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

           भोसरी मधून आळंदीकडे जाणा-या मुख्य रस्ता बाजार पेठेतून जात असल्यामुळे याठिकाणी वाहनांना पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी प्रभाग क्र. ५ मध्ये  सखुबाई गबाजी गवळी उद्यानात महापालिकेच्या वतीने बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. १४ हजार सहाशे  बत्तीस चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या वाहनतळासाठी ७ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपये  इतका खर्च अपेक्षित आहे.  या वाहनतळाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. 

तळवडे गायरान येथे मातीचे पाथवे तयार करण्यात आले आहेत.  याठिकाणी २ हजार २०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना बसण्यासाठी कट्टे, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. तसेच  तळवडे येथे नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे.  एक एकरमध्ये विकसित करण्यात आलेल्या  या उद्यानात ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत.   हे  उद्यान विकसित करण्यासाठी तसेच इतर अनेक अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला  आहे.  नव्याने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्यासह माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसदस्य पंकज भालेकर, प्रसाद शेट्टी, प्रविण भालेकर, अजित गव्हाणे,  पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

          थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलिअनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले.  या कार्यक्रमास खासदार श्रीरंग अप्पा बारणे, प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी महापौर योगेश बहल, आर एस कुमार, संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य डब्बू आसवानी, राजेंद्र साळुंके, सतीश दरेकर, संतोष बारणे, चंद्रकांत नखाते, नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, नाना काटे, कैलास बारणे, विनोद नढे, माजी नगरसदस्या माया बारणे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे आदी उपस्थित होते.

शहरातील खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपळे सौदागर येथे खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. या कामासाठी ५ कोटी ५४ लाख १९ हजार रुपये  इतका खर्च करण्यात आला आहे.   कुणाल आयकॉन रोडवरील उभारण्यात आलेल्या  या अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे  लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  ४ मेगापिक्सेल सी.सी.टी.व्ही. कॅमेरे  बसवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.  नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येत आहेत. याकामी १७८ कोटी ५७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.  या सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य नाना काटे, शत्रुघ्न काटे, अजित गव्हाणे, माजी नगरसदस्या शितल काटे आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!